राहुरी : पत्नीसोबत झालेल्या वादातून पतीने गावठी कट्यातून स्वत:वरच गोळी झाडून घेतली. पत्नीला नांदायला पाठवत नसल्याचे सांगत माहेरील लोकांशी वाद घातल्यानंतर स्वत:वरच गोळी झाडल्याने अत्यवस्थ तरुणाला पोलिस प्रशासनाने रुग्णालयात दाखल केले.
राहुरी तालुक्यातील चिंचोली फाटा येथे काल बुधवारी ही घटना घडली असून सोमनाथ रामभाऊ वाकचौरे असे 32 वर्षीय अत्यवस्थ तरुणाचे नाव आहे.
राहुरीतील तरुणीसमवेत सोमनाथ वाकचौरे या तरुणाचा प्रेमविवाह झाला होता. विवाहानंतर दोघांमध्ये खटके उडू लागले. वाकचौरे पत्नीला त्रास देत असल्याचे सांगत माहेरीच्या लोकांनी तिला राहुरीच्या घरी आणले होते.
माहेरी आलेल्या पत्नीला नांदण्यास पाठवावे, अशी मागणी वाकचौरेकडून होत होती. परंतू पत्नी नांदण्यास येत नव्हती. त्याच नैराश्यातून सोमनाथ वाकचौरे याने बुधवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास गावठी कट्ट्यासह चिंचोली हद्द गाठली. पत्नीच्या नातेवाईकांना दमबाजी करत खिशातून गावठी कट्टा काढला. ‘गोळ्या घालून तुम्हाला ठार मारेल’, अशी दमबाजी करत असतानाच तेथे गर्दी जमा झाली. माहेरीचे लोक आणि झालेली गर्दी पाहून तरुणाने दुचाकीजागेवरच सोडून पळ काढला.
गुहा-चिंचोली फाटा हद्दीतील भंडारदरा कालव्याजवळ गावठी कट्यातून स्वतःच्या डोक्याजवळ गोळी झाडून घेतली. हनुवटीच्या खालीच्या बाजुला गोळी घुसल्याने वाकचौरे गंभीर जखमी झाले आहेत. त्यास रक्तभंबाळ अवस्थेत पाहून गावकर्यांनी पोलिसांना या घटनेची माहीती दिल्यानंतर राहुरी पोलीस घटनास्थळी येवून जखमीला उपचासाठी रुग्णालयात हलवले.