कोपरगाव: कोपरगाव तालुक्यातील चासनळी शिवारात गोदावरी नदी पात्रात ( Koparagoan Godavari River) साधारण दीड महिन्यापुर्वी गाठोड्यात बांधलेल्या अवस्थेत चार वर्षाच्या चिमुरड्याचा मृतदेह मिळून आला होता. या बाबत पोलिसांनी सखोल तपास करत या गुन्ह्याची उकल केली आहे.
अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्यानं आई आणि तिचे प्रियकरानेच पोटच्या मुलाची हत्याकरुन त्याचा मृतदेह गोदावरी नदीत फेकून दिल्याची खळबळजनक माहीती समोर आली आहे. कोपरगाव पोलिसांनी मुलाची आई शितल ज्ञानेश्वर बदादे आणि तिचा प्रियकर सागर शिवाजी वाघ या दोन्हांना बेड्या ठोकल्या आहे.
या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 20 डिसेंबर 2024 रोजी कोपरगाव तालुक्यातील चासनळी शिवारातील नदीपात्रात चार वर्षाच्या चिमुरड्याचा गाठोड्यात बांधलेल्या अवस्थेत मृतदेह तरंगत असल्याचे दिसून आले होते. यावेळी मृतदेहाची ओळख पटवणे आणि गुन्हाचा तपास हे पोलीसांपुढे आव्हान होते मात्र कोपरगाव पोलीसांनी शवविच्छेदन अहवाल आणि तांत्रिक पुराव्याच्या मदतीने चार वर्षांच्या कार्तिकची ओळख पटवून त्याच्या हत्येच कोड सोडवल आहे.
निफाड तालुक्यातील साकोरी मिग येथे वास्तव्यास असणा-या कार्तिकच्या आईनच प्रियकराच्या मदतीने आपल्याच पोटच्या मुलाचा खुन करत त्याला गाठोड्यात बांधून दुचाकीवरुन नेवून गोदावरी नदीपात्रात फेकून दिल्याच पोलीस तपासात निष्पन्न झाल आहे.
मयत कार्तिकची आई शितल ही पती पासून वेगळी राहत होती. कार्तिक देखिल आई सोबत राहत होता. यादरम्यान तिचे सागर ज्ञानेश्वर बदादे यांच्या सोबत प्रेम संबंध जुळले. यातून कार्तिक याची अडसर निर्माण होत असल्याने चार वर्षाच्या कार्तिकच्या हत्येचा प्लॅन केला.
अनैतिक संबंधात चार वर्षाचा मुलगा कार्तिक हा अडसर ठरत असल्याने आई आणि प्रियकराने त्याची हत्या केल्याची बाब समोर असून पोलिसांनी आरोपी प्रियकर सागर शिवाजी वाघ राहणार चांदवड आणि मयत कार्तिकची आई शितल ज्ञानेश्वर बदादे यांना अटक केली आहे.
कार्तिकचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी वडील ज्ञानेश्वर बदादे आले असता त्यांनी आपली बायको शितल ज्ञानेश्वर बदादे,वय 25 साकोरी मिग तालुका निफाड हिच्या विषयी व तिच्या प्रियकराबाबत माहिती देत त्यांनीच हे कृत्य केल्याची माहिती दिली होती. त्यानुसार हत्या झाल्यापासून आरोपी पोलिसांनी चकवा देत होते. पोलिसांचा अहिल्यानगरसह नाशिक जिल्ह्यात तपास सुरू असताना सदरची महिला ही दिंडोरी परिसरात असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी पथक तयार करून आरोपी शितल ज्ञानेश्वर बदादे हिला दिंडोरी येथून ताब्यात घेतले तसेच तिच्या प्रियकराविषयी माहिती घेऊन प्रियकर आरोपी सागर शिवाजी वाघ रा. बोऱ्हाळे ता. चांदवड यास सापळा रचून भऊर, ता देवळा जी नाशिक येथून मोठ्या शिताफिने अटक केली आहे.