शिर्डी : जागतिक दर्जाच तीर्थक्षेत्र असलेल्या शिर्डीतील दुहेरी हत्याकांडाचे कारण लूटमार असले तरी यामुळे शिर्डीचं खरं वास्तव समोरं आलं आहे. शिर्डीचा गुन्हेगारीचा मागील काही वर्षाचा इतिहास तपासला तर दिवसेंदिवस अनेक गुन्हेगारांच्या टोळ्या निर्माण झाल्या असून शिर्डीतील गुन्हेगारीचा आलेख वाढतच चालला आहे. अवैध व्यवसाय, बेकायदेशीर वाहतूक, पत्र्यांच्या खोल्यात भरमसाठ बाहेरून येणारे रहीवाशी अशा अनेक कारणांमुळे शिर्डी नेहमीच गुन्हेगारी स्वरूपात चर्चेत राहील आहे.
शिर्डीत अनेक ठिकाणी बाहेरील जिल्हा तसेच राज्यातील अनोळखी लोकांना पत्र्याच्या भाड्याने खोल्या भाडोत्री दिल्या आहेत. त्यांचे कोणतेही पोलीस रेकॉर्ड तसेच ओळखपत्र न तपासता अनेक लोकांना आश्रय दिला जातो. याचं रेकॉर्ड नगर शिर्डी परिषद तसेच शिर्डी पोलिसांकडेही नाही.
शिर्डीत अनेक छोट्या मोठ्या लॉजिंगवर देहव्यापाराचा धंदा सर्रास सुरु असून हे लॉज मालक चालक कुणाकडूनही ओळखपत्र नघेता अनोळखी जोडप्यांना रूम्स देतात. विशेष म्हणजे हा व्यवसाय मंदिराच्या जवळच असलेल्या लॉजिंगवर तसेच अनेक हॉटेलवर सुरु आहे. त्यामुळे शिर्डीची बदनामी होत आहे.
शिर्डीत अनेक ठिकाणी बेकायदेशीर दारू, गुटखा, गांजा, अमली पदार्थ, नशेच्या गोळ्या, व्हाईटनर हे पदार्थ पानटपरी पासून ते जनरल्स स्टोअर मध्ये सहज मिळतात. त्यामुळे भिकारी,लहान मुलं-मुली तसेच गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांना नशेचे पदार्थ सहज उपलब्ध होत असल्याने गुन्हेगारी वाढली आहे.
शिर्डीतील हॉटेल्स व रेस्टॉरंट, दुकाने रात्री बारा वाजेपर्यंत चालू ठेवण्याचा नियम पोलीस प्रशासनाने करूनही अनेक हॉटेल्स, रेस्टॉरंट, दुकाने, पान टपऱ्या बारा नंतर रात्रभर सुरूच असतात.
शिर्डीत अवैध प्रवासी वाहनांची संख्या संपूर्ण जिल्ह्यात सर्वात जास्त असून ऍपे रिक्षा, कृझर, टेम्पो ट्रॅव्हलर, बस व इतर चारचाकी वाहने सर्रास भर रस्त्यावर पार्क करून भाविकांना शिंगणापूर, छत्रपती संभाजीनगर , नाशिक दर्शनासाठी लगट करतात, परिणामी वाहतूक कोंडी तर होतेच परंतु ह्या वाहनात प्रवासी भरण्यासाठी व पैसे कमविण्यासाठी जीवघेणी स्पर्धा होत असतात. चालक आणि मालकांची इतकी मोठी दहशत आहे कि ते थेट साई मंदिराच्या गेट नं 1,4 आणि 5 याठिकाणी बेकायदेशीर आपली वाहने पार्क करतात. हे सर्व वाहतूक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समोरं होत असून,वाहतूक शाखेचे अधिकारी, कर्मचारी फक्त बघ्याची भूमिका घेतात.या माध्यमातून बेकायदेशीर ट्रॅव्हल्स चा व्यवसाय करणाऱ्या लोकांच्या टोळ्या निर्माण झाल्या असून त्यातून भाविकांची लुट होत आहे.
शिर्डीत एजेंट अर्थात पॉलिशवाल्यांची संख्या अचानक हजारोच्या प्रमाणात वाढली असून हे स्थानिक तसेच अनेक लोक बाहेरील जिल्ह्यातील व राज्यातील गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून ते भाविकांची वाहने भर रस्त्यात अडवून तर कधी भाविकांच्या गाड्यांचा पाठलाग करून त्यांना पार्किंग, झटपट दर्शन,स्वस्तात रूम्स,पूजेचे साहित्य,व्हीआयपी पास चे आमिष दाखवून भाविकांची दिशाभूल करून त्यांना सर्रासपाने लुट आणि फसवणूक करत असून यासंदर्भात अनेक तक्रारी होऊनही शिर्डी पोलीस प्रशासन व साई संस्थान ठोस कारवाई करत नसल्याने या धंद्यात अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी प्रवेश केला असून त्यांच्या वेगवेगळ्या टोळ्या शिर्डीत कार्यरत आहे.
साई संस्थान आपला परिसर सोडून बाहेरील परिसरात सुरक्षा देण्यास निष्फळ ठरली असून साई मंदिर परिसरात फोटो काढणारे, टिळा लावणारे,हातावर मुर्त्या व फोटो विकणारे, झटपट दर्शन घडवून आणणारे, भिकारी, यासंह पाकीटमार सर्रासपने वावरत असून संस्थान सुरक्षा रक्षक व पोलीस प्रशासन यांच्यावर कोणतीच कारवाई करत नसल्याने याचा त्रास भाविकांना व स्थानिक नागरिक,महिलांना सुद्धा होत आहे.
शिर्डी पोलीस अधिकाऱ्यांची ठराविक हॉटेल मालक तसेच दुकानदार यांच्याशी असलेले घानिष्ठ संबंध व त्यांच्या मार्फत होणारा हस्तक्षेप हा सर्वसृत असून अनेक अधिकारी कर्मचारी याठिकाणी कायमच दिसतात त्यामुळे शिर्डी पोलिसांची प्रतिमा मालिन होत आहे.
शिर्डीत शहरात व मंदिर परिसरात खास करून मंदिराच्या चौहूबाजूने अतिक्रमण करून अनेकांनी व्यवसाय थाटले असून त्यांना स्थानिकांचे पाठबळ मिळत असल्याने याठिकाणी लहान मुलांच्या खेळासाठी इलेक्ट्रॉनिक कार, घोडे, हे थेट मंदिराच्या गेटपर्यंत पोहचल्याने सुरक्षेच्या सर्व नियमांची पायमल्ली होत असून अतिरिक्त पोलीस,सीआयडी, आयबी यासारख्या केंद्रीय पोलीस सुरक्षा यंत्रणा कुठलाही पंचनामा, सर्वे करून तो रिपोर्ट वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवलेलं आढळत नाही.तर पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन, न्यायालय प्रशासन, आमदार, मंत्री तसेच काही माजी विश्वस्थ्यांच्या स्वीय सहाय्यकांचा जनसंपर्क कार्यालयात कायमच गराडा असून त्यामध्ये संस्थांनचे अधिकारी, कर्मचारीही सामील झाले असल्याने केवळ वरिष्ठ्यांची व त्यांच्या नातेवाकांची व्हीआयपी दर्शनासाठी या स्वीय सहाय्यकांची दादागिरी सर्वजण दररोज अनुभवत असून सुद्धा साई संस्थान प्रशासन यावर पायबंद घालण्यावर अपयशी ठरले आहे.
अर्थात ज्या भाविकांच्या देणगीच्या जीवावर साई संस्थान हे राज्यातील सर्वात श्रीमंत झाले आहे त्याच भाविकांची सुरक्षा आज धोक्यात आली असून दिवसेंदिवस घडणाऱ्या या गुन्ह्यांच्या गंभीर घटनेमुळे शिर्डीचे नावं देश विदेशात बदनाम झाले असून शिर्डी हे गुन्हेगारांचा अड्डा व सेफ्टी ठिकाण झालं आहे हे नाकारून चालणार नाही.
शेवटी माझं गावं माझी जबाबदारी ही संकल्पना प्रत्येक वार्डातील नगरसेवक, लोकप्रतिनिधी यांनी घेतली तर शिर्डीतील गुन्हेगारी नक्कीच कमी होईल व शिर्डीचं भविष्य अबाधित राहील.
शिर्डीत दुहेरी हत्याकांड होऊन चोवीस तासही उलटले नाही तर पोहेगांव येथे रात्री दीडच्या सुमारास दुचाकी वर असलेले दहा ते आकरा गुंडानी हातात चॉपर तसेच लोखंडी रॉड घेऊन कांदा वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांच्या चारचाकी वाहनांचा पाठलाग करून काचा फोडून गाडीचे नुकसान केले तर ड्राइवर ने प्रसंगावधान दाखवत गाडी न थांबता वेगाने निघून गेल्याने या हल्ल्यात सुदैवाने त्यांचे प्राण वाचले.
शिर्डीत अपुऱ्या मनुष्य बळामुळेच गुन्हेगारी फोफावली आहे हे अधोरेखित झालं असलं तरी दुहेरी हत्या कांडातील दोन्ही आरोपी पोलिसांनी गजाआड केले मात्र यानंतर साईनगरी शांत होईल का? स्थानिकांच्या जीवावर बेतल तर मग देशाभरातून येणारा साईभक्त खरचं सुरक्षित आहे का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.