मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख प्रकरणात आवाज उठणा-या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितला होता. अखेर अजित पवारांनी अंजली दमानिया यांना भेटीसाठी बोलावलं आहे. थोड्याच वेळात अंजली दमानिया आणि अजित पवार यांची भेट होणार आहे. बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर राज्यात वातावरण चांगलंच तापलं असून, संतापाची लाट आहे. या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी सात आरोपींना अटक केली आहे, त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात आरोप झाल्यानं वाल्मिक कराड याच्यावर देखील मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. मात्र वाल्मिक कराड याची तब्येत बिघडल्यानं त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याच्यावर सुरू असलेल्या उपचारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत दमानिया यांनी गंभीर आरोप केले होते.
नेमकं काय म्हणाल्या होत्या दमानिया?
मी यासंदर्भात आधीच ट्विट केलं होतं, मी जेव्हा त्याचा रिपोर्ट पाहिला तेव्हा त्याला काहीही झालं नसल्याचं दिसून आलं तो ठणठणीत बरा आहे. मग त्याची केवळ बडदास्त ठेवण्यासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं का? त्याच्यामुळे आकरा रुग्णांना आपले बेड खाली करावे लागले. या प्रकरणात त्या रुग्णालयातील अधिकाऱ्यांची आणि डॉक्टरांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी दमानिया यांच्याकडून करण्यात आली आहे. तसेच त्यांनी संतोष देशमुख यांच्या पोस्टमार्टम अहवालावर देखील संशय व्यक्त केला आहे. शवविच्छेदन अहवाल योग्य दिला का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान अंजली दमानिया यांनी अजित पवारांकडे भेटीसाठी वेळ मागितला होता. अजित पवार यांनी आता दमानिया यांना भेटीसाठी वेळ दिला आहे. थोड्याच वेळात त्यांची भेट होणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.