शिर्डी : शिर्डी सारख्या आंतरराष्ट्रीय तीर्थस्थानी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अनेक अवैध व्यवसाय फोफावले आहेत, आणि त्यातून गुन्हेगार आणि गुन्हेगारी वाढत चालल्याच दिसून येतयं. शहराच्या अनेक भागात अवैध व्यवसायांचे अड्डे निर्माण झाल्याने स्थानिक नागरीकांबरोबरच साई भक्तांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्यानं या अवैध व्यवसायांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शिर्डीकरांकडून केली जात आहे.
अवैध दारू व्यवसाय, मटका, गांजा, गुटखा तस्करी, अवैध वाहतूक व वेश्या व्यवसाय यामुळे शिर्डी सारखं उच्चदर्जाच तीर्थस्थान बदनाम होताना दिसतयं. त्याच बरोबर शिर्डीत पॉलिशवाले एजंट, लटकू गॅंग,व्हाईटरनर गॅंग यांचा उच्छाद सुरूच असून बाहेरुन अलबेल दिसणारी साईनगरी आतून पोखरली जात असल्याने जिल्हा पोलीस प्रशासनाने विषेश पथक नेमून याठिकाणी गुन्हागारीला आळा घालावा अशी मागणी नागरीकांकडून केली जात आहे.
साईंच्या शिर्डीत अवैध व्यवसायांचा विळखा पडला असून, अनेक गुन्हेगार, गुन्हेगारांच्या टोळ्या यांचे वर्चस्व या अवैध व्यवसायावर असून काही पोलीस व स्थानिक ग्रामस्थांचे पाठबळ मिळत असल्याने यांचे मनोबल वाढले आहे. शिर्डीत भाविकांची सुरक्षा, स्थानिक नागरिकांची सुरक्षा याचे तीनतेरा कधीच वाजले असून, शिर्डीत पोलिसांकडून धातूर-मातूर कारवाई दिखावा केला जात असल्याचा आरोप शिर्डीकर करत आहे.
अलिकडेच भाजपचे माजी खासदार डॉ.सुजय विखे पाटलांनी भिकारी आणि परराज्यातील गुन्हेगार शिर्डी बकाल करत असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. साई प्रसादालयात मोफत भोजन, रुग्णालय मोफत, काही तासात शेकडो रुपयांची कमाई करण्याचे नवनवीन फंडे यामुळे शिर्डीत स्थानिक नागरीकांच्या सरक्षेचा प्रश्न उपस्थीत झाला आहे.
जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी याबाबत ग्राऊंड रिपोर्ट घेवून अवैध व्यवसाय आणि गुन्हेगारीचा आढावा घ्यावा अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.