राहाता : हात चलाखी करून एटीएम कार्डची (ATM Fraud) अदलाबदल करणारा मध्यप्रदेश राज्यातील भोपाळ येथील तरूणास राहाता पोलिसांनी (Ahilyanagar Police) मोठ्या शिताफीने ताब्यात घेऊन त्याच्याकडील असलेले विविध बँकेचे एकूण 69 एटीएम हस्तगत केले आहे. 35 वर्षीय एमबीए मध्ये शिक्षण घेतलेला दीपक राजेंद्र सोनी असे या भामट्याचे नाव आहे. पोलीसांनी त्याला राहाता एसबीआय एटीएम येथून रंगेहाथ ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलीस उपअधीक्षक शिरीष वमने (dysp Shirish Wamne) यांनी दिलेल्या माहिती नुसार, राहाता येथील भारतीय स्टेट बँकेसमोर असलेल्या एटीएम मशीन जवळ रविवारी सायंकाळी 6 वाजेच्या दरम्यान एक अनोळखी इसम एटीएम जवळ सशक्तीकरण फिरत असल्याचा फोन राहाता पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे यांना आला. पोलीस उपनिरीक्षक शिंदे हे पथकासह स्टेट बँकेच्या एटीएमकडे धाव घेत त्या ठिकाणी एटीएमच्या बाहेर फिरत असलेल्या व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याची अंग झडती घेतली असता त्याच्याजवळ विविध बँकेचे एकूण 69 एटीएम व दोन फेविक्विक ट्यूब सापडले आणि एक आयफोन मिळून आला आहे.
फेविक्विकचा वापर करत चलाखी
काही महिन्यापूर्वी शिर्डी नजीकच्या नांदुर्खी येथील एका व्यक्तीचे या भामट्याने एटीएमची अदलाबदल करत पैसे काढले होते. पोलीसांनी योग्यवेळी या भामट्याला पकडल्यामुळे पोलीसांचे नागरिकांमधुन कौतुक केले जात आहे. हा भामटा एटीएम मशिनमध्ये कार्ड टाकण्याच्या जागेवर फेविक्विक लावून ठेवायचा. त्यामुळे एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी आलेल्या व्यक्तीने एटीएममध्ये कार्ड टाकले तर ते चिटकून बसायचे. या ठिकाणी उपस्थित असलेला भामटा या संधीचा फायदा घेत तात्काळ हात चलाखी करत एटीएम कार्डची आदलाबदल करत पैसे काढायचा. या घटनेनंतर पोलीसांनी भेट देऊन या भामट्याची माहिती घेतली.
पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे हे या गुन्ह्याचा तपास करीत आहे. या भामट्याला न्यायालयात हजर केले असता राहाता न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे.
उच्चशिक्षित आरोपी-
आरोपीचे नाव दीपक राजेंद्र सोनी वय 35 वर्षे असून छत्रपूर, मध्यप्रदेश येथिल राहणारा आहे. एमबीए पर्यंत त्याने उच्च शिक्षण घेतले असून महाराष्ट्र तो काही दिवस राहून नंतर पुन्हा गावी जात. त्याच्या सोबत त्याचा आणखी एक साथीदार असल्याची माहीती पोलीसांना आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासे, श्रीरामपुर, राहाता असे अनेक ठिकाणी नवनवीन पद्धत वापरून त्याने आत्ता पर्यंत लोकांना लाखो रुपये उडवले आहेत. त्याच्याकडे एक दोन नव्हे तर वेगवेगळ्या राष्ट्रीयकृत बॅंकाचे 69 डेबीट कार्ड मिळून आले आहे. अनेक दिवसापासून तो अशा पद्धतीने एटीएम कार्डच्या माध्यमातून हातचलाखी करुन पैशावर डल्ला मारत असल्याच समोर येतय. त्याच्या सोबत आणखी कोण कोण साथीदार आहे, महाराष्ट्र कोठे कोठे ते अशा पद्धतीने पैसे लुबाडत होते याचा पोलीस शोध घेत असून एटीएम च्या माध्यमातून फसवणूक झालेल्या त्या लोकांचा शोध राहाता पोलीस घेत आहेत.