शिर्डी | सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांनी शिर्डीतील साईबाबा समाधीचे दर्शन घेतल्यानंतर चीन संदर्भात महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. “सिक्कीम हे सीमावर्ती राज्य असून आमची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. मात्र आम्ही पूर्णपणे सज्ज आहोत. भारतीय सैन्य अत्यंत सक्षम असून कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याची आमची तयारी आहे,” असं स्पष्ट वक्तव्य त्यांनी केलं.
मुख्यमंत्री तमांग शनिवारी आपल्या मंत्रीमंडळातील काही सहकाऱ्यांसह शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी आले होते. त्यांची ही शिर्डीतील पहिली भेट होती. दर्शनानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी साईबाबांवरील श्रद्धा व्यक्त केली. “सिक्कीममध्ये गावागावांत मंदिरे आहेत. मी लहानपणापासून साईबाबांचा भक्त आहे. आज समाधीचे दर्शन घेताना खूपच समाधान मिळालं,” असं ते श्रद्धेनं म्हणाले.
हिमालयात सैन्याचं शक्ती प्रदर्शन
अलिकडच्या काळात उत्तर सिक्कीममध्ये भारतीय सैन्याने हिमालयीन परिसरात शक्ती प्रदर्शन केलं. याच पार्श्वभूमीवर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “2014 नंतर भारतीय सैन्य अधिक सक्षम झालं आहे. पायाभूत सुविधा वाढल्या असून सैन्य दल अधिक सज्ज आणि शक्तिशाली झालं आहे. उत्तर सिक्कीममध्ये झालेलं सैन्य प्रदर्शन हे त्याचं उदाहरण आहे. आम्ही याचे साक्षीदार आहोत.”
पंतप्रधान मोदींना ‘मोठा भाऊ’ मानतो
राजकीय पातळीवर बोलताना मुख्यमंत्री तमांग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास व्यक्त केला. “पंतप्रधान मोदी सिक्कीमवर विशेष प्रेम करतात. सिक्कीमच्या विकासासाठी केंद्र सरकार सातत्याने सहकार्य करत आहे. त्यामुळे आम्ही त्यांना ‘मोठा भाऊ’ मानतो. भाजप हा आमच्यासाठी मार्गदर्शक पक्ष आहे,” असं त्यांनी नमूद केलं.
डोकलाम इश्यू नंतर शांतता, मानसरोवर यात्रा लवकरच सुरु
सिक्कीमचं भौगोलिक स्थान अत्यंत संवेदनशील आहे. चीन, नेपाळ आणि भूतान या तीन देशांच्या सीमांसोबत सिक्कीमची आंतरराष्ट्रीय सीमा जोडलेली आहे. 2017 मध्ये डोकलाम भागात भारत-चीन दरम्यान निर्माण झालेल्या तणावानंतर संपूर्ण देशाचं लक्ष सिक्कीमकडे वळलं होतं.
या प्रश्नावर बोलताना मुख्यमंत्री तमांग म्हणाले, “डोकलाम मुद्द्यानंतर परिस्थिती अधिक संवेदनशील झाली होती. मात्र आता या सीमांवर शांतता आहे. लवकरच मानसरोवर यात्रा पुन्हा सुरु होणार असल्याची चिन्हं आहेत. केंद्र सरकारकडून त्यासाठी तयारी सुरू आहे.”
शिर्डीच्या भूमीतून देशाला एकात्मतेचा संदेश
मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांच्या या भेटीमुळे शिर्डीत वेगळं वातावरण तयार झालं होतं. त्यांनी साईबाबांच्या समाधीस्थळी दर्शन घेतलं. यावेळी त्याच्या सोबत सिक्कीम राज्यातील विधानसभा अध्यक्ष तसेच इतर सहकारी मंत्री उपस्थित होते.
साई बाबा संस्थानच्या वतीनं मुख्यकार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग याच्या सह इतर सर्वांचा सत्कार करण्यात आला.