कोपरगाव तालुक्यातील येसगाव शिवारात रविवारी (29 जून) सकाळी घडलेली एक थरारक घटना संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे. ऊसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने (Leopard attack 4 years old child) चार वर्षांच्या चिमुकल्यावर झडप घातली. मात्र प्रसंगावधान राखत धावून आलेल्या आजोबांनी आपल्या नातवाला बिबट्याच्या तावडीतून वाचवत धाडसाचे मूर्तिमंत उदाहरण साऱ्यांसमोर ठेवले.
koparagoan news grandfather fight with leopard for the granddaughter
घटना कशी घडली?
सकाळी सुमारे 11 वाजता कोपरगाव तालुक्यातील येसगाव शिवारातील कोल्हे वस्तीजवळील सुराळकर वस्तीवर ही घटना घडली.
कुणाल अजय आहेर (वय 4) हा चिमुकला त्याची आई घराच्या कामासाठी बाहेर निघाली असता तिच्या मागोमाग घराबाहेर गेला. त्याचवेळी ऊसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक कुणालवर हल्ला चढवला. बिबट्याने कुणालच्या मानेवर चावा घेत त्याला उसाच्या शेतात फरफटत नेले.
आजोबांनी दाखवले धैर्य
नातवाचा किंकाळी ऐकून त्याचे आजोबा मच्छिंद्र आहेर यांनी एकही क्षण न गमावता उसाच्या शेतात धाव घेतली. त्यांनी बिबट्याच्या दिशेने झडप घालत त्याला घाबरवून पळवले. नातवाला बिबट्याच्या तावडीतून सोडवून त्यांनी मोठा पराक्रम केला. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी बिबट्याशी झुंज दिली.
चिमुकला गंभीर जखमी
घटनेनंतर तातडीने कुणालला कोपरगाव शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
प्रशासन आणि राजकीय नेत्यांचा प्रतिसाद
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करण्यात आला असून त्या भागात पिंजरा लावण्यात आला आहे. बिबट्याचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
कोपरगावच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी रुग्णालयात जाऊन जखमी बालक व त्याच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि धीर दिला.
गावकऱ्यांमध्ये भीती व संताप
या घटनेमुळे येसगावसह परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मागील काही दिवसांत तालुक्यात बिबट्याचा वावर वाढल्याची नोंद झाली असून ग्रामस्थांनी तातडीने पिंजरे वाढवण्याची मागणी केली आहे. वनविभागाकडे सध्या मर्यादित पिंजरे असल्याने संकट अधिक गडद झाले आहे.
आजोबांचे कौतुक
आजोबा मच्छिंद्र आहेर यांच्या धाडसाचं सर्वत्र कौतुक होत आहे. सोशल मीडियावर आणि गावकऱ्यांमध्ये त्यांच्या पराक्रमाची जोरदार चर्चा सुरू आहे. अशा प्रसंगात सामान्य माणूस हादरून जातो, पण मच्छिंद्र आहेर यांनी आपल्या नातवासाठी जीवाची पर्वा न करता दिलेली झुंज कौतुकास्पद आहे.