शिर्डी: प्रजासत्ताक दिनाचं औचित्यसाधत शिर्डीत साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टच्या वतीनं मोतीबिंदू मुक्त शिर्डी (free cataract camp in Shirdi) अभियान राबवण्यात आलं. गेल्या वर्षभरापासून गोरगरीब आणि गरजू नेत्र विकार रुग्णासांठी अगदी मोफत नेत्र तपासणी आणि शस्त्रक्रिया केली जाते. आत्ता पर्यंत दोन हजार रुग्णांनी या सुविधेचा लाभ घेत नवव्या शिबीराला उदंड प्रतिसाद दिला आहे.
शिर्डीच्या साई बाबांनी आपल्या हयातीत रुग्णसेवा हिच ईश्वर सेवा मानत गोरगरीबांची सेवा केली. साईंच्या ह्याच आरोग्य सेवेचा वसा हाती घेत शिर्डीतील साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टच्या वतीनं एक वर्षापासून मोती बिंदू मुक्त शिर्डी अभियानाची सुरुवात केली.
प्रजासत्ताक दिनाचे औचित्यसाधत नवव्या शिबीराचे आयोजन केले गेले. ज्यात मोठ्या प्रमाणात गरजूंनी सहभाग घेत लाभ घेतल्याची माहीती ट्रस्टच्या विेश्वस्त संगिता गायकवाड यांनी दिली.
पनवेल नवी मुंबई येथिल आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल आणि साईभक्त लक्ष्मी बाई शिंदे ट्रस्टच्या वतीनं ह्या शिबीरांचे आयोजन केले जाते. याठिकाणी रुग्णांची प्राथमिक नेत्र तपासणी तसेच नंतर तज्ञ डॉक्टरांकडून सखोल तपासणी करत गरजेप्रमाणे पुढील उपचार केले जातात. ज्या रुग्णांना मोती बिंदू शस्त्रक्रियेची गरज आहे त्यांना याठिकाणाहून अगदी मोफत पनवेल येथिल हॉस्पिटल मध्ये दाखल केले जाते.. जाणे-येणे, शस्त्रक्रिया, औषध हे सर्व मोफत दिले जाते. सध्या नऊ कॅम्प पार पडले असून यामाध्यमातून असंख्य गोर गरीब आणि गरजू रुग्णांना याचा लाभ मिळाला.
गेल्या नऊ महिन्यांपासून ही सेवा अविरतपणे सुरु असून यात साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टचे अध्यक्ष अरुण शिंदे गायकवाड, विश्वस्त संगिता अरुण गायकवाड तसेच सर्व कर्मचारी मोठ्या उत्साहाने भाग घेतात. त्याच बरोबर आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल पनवेल येथिल तज्ञ डॉक्टर आणि इतर स्टॉफ साई सेवा म्हणून हे कार्य करत आहेत.