पुणे : स्वारगेट बस डेपोतील बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे 48 तास उलटून गेल्यानंतरही पोलिसांच्या काही हाती लागला नाही. पोलिसांची 13 पथकं आरोपीचा शोध घेत आहेत. आरोपीनं बातम्यांमध्ये स्वत:चे फोटो पाहिले, यानंतर तो घरातून पळाला. दत्ता घरातून थेट ऊसाच्या शेतात लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
मंगळवारी पहाटे पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकात उभ्या असलेल्या शिवशाहीमध्ये दत्ता गाडे याने तरुणीवर अत्याचार केले, यानंतर दत्ता साडेपाच वाजण्याच्या सुमारास शिरुरमधल्या गुणाट गावात आला. दुपारपर्यंत तो घरामध्येच होता, तसंच त्याने गावातल्या कीर्तनातही सहभाग नोंदवला.
क्राईम ब्रॅंच ठाण मांडून
पुणे क्राईम ब्रँचचं पथक आरोपीच्या गुनाट गावात ठाण मांडून होते. गुनाट गावात पोलिसांच्या श्वान पथकाच्या मदतीनं आरोपी दत्ता गाडेचा शोध घेण्यात आला. श्वान पथकातील श्वानाला आरोपी दत्ताचे कपडे हुंगवण्यात आले.
श्वानपथकासह ड्रोनची मदत
श्वानपथकासोबतच ड्रोनच्या मदतीनेही आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. गुनाट गावात 25 एकर शेतशिवारात ड्रोनच्या मदतीनं आरोपीचा काही शोध लागतोय का? त्याचा काही सुगावा मिळतोय का? याची पाहणी करण्यात आली.
शंभर पोलीसांचा फौजफाटा
याचसोबत 100 पोलिसांचा फौजफौटाही गुनाट गावात दाखल झालं होतं. या 100 पोलिसांनी गावात सर्च ऑपरेशन राबवलं. याचसोबत उसाच्या फडात पोलिसांकडून नराधमाचा शोध घेण्यात आला. दिवसभर सर्व प्रकारची शोध मोहीम राबवल्यानंतरही पोलिसांच्या हाती आरोपी लागलेला नाही.
आरोपी ऊसाच्या शेतात लपल्याची माहीती पोलीसांना मिळाल्यानंतर पोलीसांनी सर्व भाग पिंजून काढला आहे. आजच्या दिवसाचं शोधकार्य संपलं असलं तरी पोलीस उद्या पुन्हा एकदा दत्ता गाडे याचा शोध घेणार आहेत.