शिर्डी : शिर्डीच्या साईबाबा (Shirdi Saibaba Trust) संस्थानमध्ये दर्शनासाठी देशविदेशातून लाखो भाविक येत असतात. दर्शनानंतर अनेक भाविकांना आपल्या भाषेत “श्री साई सचरित्र” ग्रंथ खरेदी करून घरी घेऊन जाण्याची इच्छा असते. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून संस्थानच्या प्रकाशन व पुस्तके विभागात विविध भाषांतील साई सचरित्र ग्रंथ (Sai Charirta) उपलब्ध नसल्याने भाविकांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे.
sai-devotees-are-upset-as-sai-scriptures-are-not-available-in-shirdi
हिंदी, इंग्रजी, तेलगू, ओडिया यांसारख्या अनेक भाषांमध्ये साईबाबांचे सतचरित्र प्रकाशित करण्यात आले आहे. परंतु सध्या प्रकाशन विभागात ही पुस्तके मिळत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. साईभक्तांच्या श्रद्धेचा भाग असलेले हे ग्रंथ उपलब्ध नसल्यामुळे अनेक भाविक नाराजी व्यक्त करत आहेत.
❝ प्रकाशन विभाग साईभक्तांचा मनस्ताप वाढवतोय ❞
स्थानिक साईभक्तांप्रमाणेच परराज्यातून येणाऱ्या भक्तांनाही आपापल्या भाषेत साई चरित्र घ्यायचं असतं. मात्र, सध्या “शिल्लक नाही”, “परवानगी प्रक्रियेत आहे”, “मागणी पाठवलेली आहे” अशी उत्तरं देऊन भक्तांना निराश केलं जात आहे. या प्रकारामुळे “प्रकाशन विभाग साईभक्तांचा मनस्ताप वाढवतोय” अशी थेट टीका काही भाविकांनी केली आहे.
समितीच्या परवानगीवर अवलंबून कार्यपद्धती?
या संपूर्ण प्रकरणात शिर्डी साई संस्थानच्या प्रकाशन विभागाचे कारभार पद्धतशीर नसल्याचं स्पष्ट होत आहे. स्थानिकांनी विचारणा केल्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार, “आम्हाला समितीची परवानगी घ्यावी लागते, त्यानंतरच खरेदी करता येते. मागणी नोंदवली आहे, पण अजून ग्रंथ आलेले नाहीत,” असं सांगून संस्थानकडून वेळ मारून नेल्याचे चित्र दिसत आहे.
साईचरित्र म्हणजे श्रद्धेचा ग्रंथ
श्री साई सचरित्र हा ग्रंथ साईभक्तांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू आहे. साईबाबांच्या चरित्रावर आधारित हा ग्रंथ भक्तांसाठी केवळ एक वाचनसामग्री नसून, अध्यात्मिक बळाचा स्रोत आहे. त्यामुळे विविध भाषांतील हे ग्रंथ उपलब्ध ठेवणं हे संस्थानचं धार्मिक, नैतिक आणि भावनिक दायित्व आहे.
साईभक्तांची मागणी: तात्काळ साईचरित्र उपलब्ध करावं
साई संस्थान प्रशासनाने तात्काळ विविध भाषांतील साई चरित्र आणि इतर साईबाबांविषयीचे ग्रंथ उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी साईभक्तांमधून जोर धरत आहे. प्रकाशन विभागाच्या अकार्यक्षमतेमुळे संस्थानची प्रतिमा मलीन होत असल्याचंही अनेकांचे मत आहे.