शिर्डी | जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्याला भारतीय सैन्यदलानं ठोस प्रत्युत्तर दिलं असून ऑपरेशन सिंदूरच्या (operation sindoor) माध्यमातून पाकिस्तानातील अतिरेकी तळ उद्ध्वस्त करण्यात आले. यानंतर देशभरात भारतीय जवानांच्या शौर्याबद्दल अभिमान व्यक्त करत विविध शहरांमध्ये तिरंगा रॅलीचं (shirdi tiranga rally) आयोजन केलं जात आहे. शिर्डीतही नागरिकांनी देशभक्तीचा जल्लोष करत तिरंगा रॅली काढली, आणि यामध्ये राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (radhakrishna vikhe patil) यांनीही सक्रीय सहभाग घेतला.
(send pakistan lovers to terrorists shirdi minister radhakrishna vikhe patil opponents criticized)
काय म्हणाले मंत्री विखे पा.
या रॅलीत मंत्री विखे पाटील यांनी जोरदार भाषण करत विरोधकांवर सडकून टीका केली. “भारतीय जवानांच्या शौर्यावर संशय घेणारे भंपक विकृतीचे लोक आहेत. अशा लोकांना देशाच्या सीमेवर पाठवून त्यांना खरी परिस्थिती काय असते ते दाखवून द्यावं. शिवाय ज्यांना पाकिस्तानचा पुळका आहे, त्यांनी थेट दहशतवाद्यांच्या हवाली करावं. त्यांची खरी जागा तिथंच आहे,” असं तीव्र शब्दांत त्यांनी विरोधकांना सुनावले.
रॅलीदरम्यान ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ आणि ‘पाकिस्तान मुर्दाबाद’च्या घोषणा देण्यात आल्या. शेकडो नागरिक तिरंगा हातात घेऊन शिस्तबद्धपणे रस्त्यावर उतरले होते. रॅलीच्या माध्यमातून भारतीय सैन्याला पाठिंबा दर्शवण्याचं आणि देशविरोधी मानसिकतेला सडेतोड उत्तर देण्याचं उद्दिष्ट होतं.
शिर्डीत तिरंगा रॅली
मंत्री विखे पाटील यांच्या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं असून, त्यांच्या या आक्रमक भूमिकेचं काही ठिकाणी समर्थन होत असताना, विरोधकांनी मात्र हे वक्तव्य देशातील वातावरण तापवणारं असल्याचं म्हटलं जातंय.
संपूर्ण रॅली दरम्यान देशभक्तीचा जोरदार जयघोष पाहायला मिळाला. अबाल वयोवृद्धांनी हातात भारतता तिरंगा झेंडा घेवून सहभाग घेतला. नगर – मनमाड या मुख्य रस्त्यावरुन निघालेली तिरंगा रॅलीचा साई बाबा संस्थानच्या शताब्दी मंडपात समारोप झाला.