अहिल्यानगर | अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा गावाने आपल्या शूर सुपुत्राला, हवालदार संदीप पांडुरंग गायकर यांना (shahid sandip pandurang gaikar) अखेरचा निरोप दिला. जम्मू-काश्मीर येथे देशाच्या सुरक्षेसाठी लढताना त्यांनी प्राणांची आहुती दिली. त्यांच्या वीरमरणाच्या बातमीने संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून गावभर ‘संदीप गायकर अमर रहे’ च्या घोषणा घुमत होत्या.
कर्तव्यनिष्ठ सेवकाचे शौर्यपूर्ण बलिदान
संदीप गायकर हे भारतीय सैन्याच्या मराठा लाइट इन्फंट्री बटालियनमध्ये कार्यरत होते. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरुद्ध सुरू असलेल्या विशेष ऑपरेशन दरम्यान त्यांनी पराक्रम गाजवला. त्यावेळी झालेल्या चकमकीत ते गंभीर जखमी झाले आणि उपचारांदरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
घरात शून्य, गावात स्तब्धता
संदीप यांच्या निधनाची बातमी गावात पोहचताच त्यांच्या आई सरूबाई व पत्नी दिपाली यांना अश्रू अनावर झाले. त्यांच्या एक दीड वर्षाच्या चिमुकल्या रेयांशच्या चेहऱ्यावर अज्ञानतेचे भाव तर त्यांच्या मातोश्रींच्या डोळ्यात काळीज हेलावणारे दु:ख… हे दृश्य पाहून उपस्थितांचे डोळेही पाणावले.
गावात कडकडीत बंद, देशभक्तीचा गजर
संपूर्ण ब्राह्मणवाडा गाव बंद ठेवण्यात आले. शाळा, बाजार, दुकानं सर्व काही बंद होतं. गावातील प्रत्येक रस्त्यावर राष्ट्रध्वज फडकत होता. संदीप गायकर यांच्या नावाने घोषणांनी गाव दुमदुमले – “शहीद संदीप गायकर अमर रहे”, “भारत माता की जय”, “वंदे मातरम्” च्या जयघोषाने आसमंत भरून गेला होता.
सैनिकाच्या बलिदानाची आठवण
संदीप यांच्या पश्चात आई सरूबाई, वडील पांडुरंग, पत्नी दिपाली, दीड वर्षांचा मुलगा रेयांश आणि दोन बहिणी असा परिवार आहे. आपल्या कामात निष्ठावान, गावात स्नेही व संयमी स्वभावाचे संदीप हे अनेक युवकांसाठी प्रेरणास्थान होते. त्यांच्या निधनाने फक्त त्यांच्या परिवाराचेच नव्हे तर संपूर्ण तालुक्याचे आणि जिल्ह्याचेही मोठे नुकसान झाले आहे.
होणार शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कार
संदीप गायकर यांच्या पार्थिवावर गावात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अंत्य दर्शनासाठी अकोले तालुक्यातील नागरिकांना मोठी गर्दी केली असून . स्थानिक प्रशासनाच्या वतीने तहसीलदार, पोलीस अधिकारी, आणि निवृत्त सैन्य अधिकारी यांनी श्रद्धांजली अर्पण करणार आहेत.