Shirdi News | शिर्डीतील गाजत असलेल्या ग्रो मोअर घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली मुख्य संशयित भुपेंद्र राजाराम सावळे उर्फ भुपेंद्र पाटील ( Bhipendra Patil) याला अटक केली. आरोपी भुपेंद्र हा गेल्या पंधरा दिवसापासून शहादा नंदुरबार (Nandurbar Police) पोलीसांच्या ताब्यात होता. त्याला त्याठिकाणी हून आता शिर्डी आणि राहाता (Rahata Court) येथिल गुन्ह्यात वर्ग करण्यात आले आहे. त्यानंतर त्याला राहाता न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने यावर सुनावणी करत 25 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
shirdi grow more scam is not a fraud investment transaction claims the accused lawyer
या प्रकरणात शिर्डी पंचक्रोशीतील अनेक गुंतवणूकदार, साईसंस्थानमधील कर्मचारी, व्यापारी, महिला यांचे कोट्यवधी रुपये अडकल्याचे समोर आले आहे. गुंतवणुकीवर अधिक परतावा मिळेल, असे आमिष दाखवून लोकांकडून मोठ्या प्रमाणावर पैसे उकळण्यात आले होते. “ग्रो मोअर इन्वेस्टमेंट फ़ायनेंस” या नावाने एक व्यवसायिक प्लॅटफॉर्म उभा करून, तेथे ऑनलाइन गुंतवणूक, ट्रेडिंग आणि मार्केटिंगच्या नावाखाली ही फसवणूक करण्यात आली होती.
आरोपीच्या वकिलांचा बचाव
भुपेंद्र पाटीलच्या वतीने बोलताना वकील बीए हुसळे यांनी न्यायालयात म्हटलं, की “ही फसवणूक नाही तर गुंतवणूकदारांनी स्वतःहून पैसे गुंतवले आहेत. दोघांमध्ये करार झाला होता, त्यामुळे हे व्यवहार वैध आहेत.”
त्यांनी असंही सांगितलं की, “जगभरातील युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय शेअर मार्केट कोसळलं. त्यामुळे ग्रो मोअर कंपनीला गुंतवणूकदारांना परतावा देणं शक्य झालं नाही. त्यामुळे ही फसवणूक नव्हे, तर एक अपयशी व्यावसायिक देवाणघेवाण आहे.”
सरकारी पक्ष मौनात
दरम्यान, या प्रकरणातील सरकारी वकीलांनी माध्यमांशी बोलण्यास स्पष्ट नकार दिला आहे. मात्र पोलीस सूत्रांनी सांगितले की, या प्रकरणात कागदपत्रे, आर्थिक व्यवहार, बँक अकाउंट तपासणे, इतर गुंतवणूकदारांचे जबाब नोंदवणे अशा सखोल तपासाची गरज आहे. त्यामुळे भुपेंद्र पाटील याला 25 जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
गुंतवणूकदारांमध्ये संताप
या घोटाळ्यामुळे शेकडो गुंतवणूकदार उघड्यावर पडले असून, अनेक कुटुंबीय आर्थिक अडचणीत सापडले आहेत. काहींनी आपली आयुष्यभराची पुंजी गुंतवली होती. त्यामुळे भुपेंद्र पाटील व इतरां विरोधात कठोर कारवाईची मागणी सध्या नागरिकांतून केली जात आहे.