शिर्डी : धार्मिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या शिर्डी शहरात लाखो रुपयांचा प्रतिबंधित गुटखा साठ्याचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या कारवाईत गणेशवाडी भागातील आशीष खाबिया या तरुणाला पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडून नामांकित कंपन्यांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. मात्र, तपासादरम्यान खाबिया हा केवळ प्यादा असून, या रॅकेटचा मुळ सूत्रधार दुसराच असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.
गणेशवाडीतील ‘आनंद निवास’मधे गुटखा साठा
शिर्डी शहरातील गणेशवाडी परिसरात असलेल्या आनंद निवास या इमारतीत गुप्त माहितीवरून पोलिसांनी छापा टाकून लाखोंचा प्रतिबंधित गुटखा साठा जप्त केला. या ठिकाणी गुटख्याचे कार्टन, पॅकिंग साहित्य, आणि वितरणासाठी वापरण्यात येणाऱ्या पिशव्या मोठ्या प्रमाणावर सापडल्या.
खाबिया..प्यादा, सूत्रधार कुठे?
पोलिसांनी कारवाईदरम्यान आशीष खाबिया याला ताब्यात घेतलं असून त्याच्यावर NDPS कायदा, FSSAI व इतर संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, खाबिया केवळ स्टोरेज व पुरवठा साखळीतील मधली कडी असल्याचं समोर आलं आहे. यामागे आर्थिक आणि राजकीय पाठबळ असलेल्या व्यक्तीचा सहभाग असल्याची माहिती मिळत आहे.
राजकीय वरदहस्त
या गुटखा किंगला स्थानिक राजकीय वरदहस्त लाभल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत असून, ‘सेटलमेंट गुरु’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या काही दलाल मंडळींनी कारवाई थोपवण्यासाठी हालचाली सुरू केल्याचंही बोललं जातंय. त्यामुळे गुटखा साखळीचा खरा सूत्रधार अद्याप अंधारात आहे.
पोलिसांचा तपास विस्तृत
पोलिसांनी कारवाईनंतर गुटखा साठ्याची माहिती घेतली असून, पैशांचा प्रवाह, वितरण नेटवर्क, आणि वरपर्यंतचा संगनमत शोधण्यासाठी पुढील तपास सुरु आहे. यासाठी काही मोबाईल फोनचे डेटा, आर्थिक व्यवहार तपासले तर यातील मुख्य सुत्रधाराचे नाव नक्की समोर येईल.
स्थानिकांची संतप्त प्रतिक्रिया
शिर्डी हे देशभरातून भाविक येणारे पवित्र तीर्थक्षेत्र असूनही येथे असा अवैध गोरखधंदा चालणं दुर्दैवी असल्याचं स्थानिकांनी म्हटलं आहे. “पोलिसांनी प्यादा पकडला आहे आता मोठ्या मास्याला पकडण तसेच साखळीचं मुळ उपटावं,” अशी मागणी नागरिकांतून होत आहे.