शिर्डी: शिर्डीच्या साईबाबांविषयी समाजमाध्यमांवर अपमानास्पद विधान करणाऱ्या गौतम खट्टर आणि अजय गौतम या दोघांना राहाता न्यायालयाने कठोर झटका दिला आहे. यापुढे या व्यक्तींना साईबाबांबाबत कोणतीही मुलाखत, चर्चा, भाष्य किंवा सार्वजनिक विधान करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
shirdi-saibaba-news-rahata-court-slaps-those-defaming-sai-baba-ban-on-gautam-khattar-ajay-gautam-for-giving-interviews-about-sai-baba
साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं की, 2023 मध्ये गौतम खट्टर यांनी माध्यमांतून साईबाबांविषयी अत्यंत आक्षेपार्ह आणि भावनांना दुखावणारी विधाने केली होती. यामुळे संपूर्ण देशभरातील साईभक्तांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली होती.
या प्रकारामुळे साईसंस्थाननं तात्काळ कायदेशीर पाऊल उचलत राहाता येथील न्यायालयात दावा दाखल केला होता. अखेर कोर्टाने हा निर्णय दिल्यानंतर शिर्डी आणि इतरत्र साईभक्तांमध्ये समाधानाचं आणि विजयाचं वातावरण आहे.
हज निधीच्या अफवांवर खुलासा; गुन्हा दाखल होणार
दरम्यान, सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये दावा करण्यात येत आहे की, “साईसंस्थाननं हज यात्रेसाठी 35 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.” मात्र, ही माहिती पूर्णपणे खोटी आणि निराधार असल्याचं स्पष्टीकरण गाडीलकर यांनी ‘एसपी २४ तास सोबत ‘ बोलताना दिलं.
“साईसंस्थाननं हज यात्रेसाठी कोणताही निधी मंजूर केलेला नाही. या प्रकारात समाजात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न असून, या अफवांचा तपास सुरू आहे. लवकरच गुन्हा दाखल केला जाईल,” असं गाडीलकर यांनी स्पष्ट केलं.
साईसंस्थानची भूमिका: श्रद्धेचा अपमान खपवून घेतला जाणार नाही
शिर्डी साईसंस्थाननं घेतलेली ही भूमिका केवळ श्रद्धेच्या रक्षणासाठी नाही, तर धार्मिक सौहार्द आणि समाजात शांतता राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कोणत्याही प्रकारच्या दिशाभूल करणा-या माहितीवर आळा घालण्यासाठी संस्थान आता अधिक कडक होताना दिसत आहे.