Shirdi News | शिर्डीत एआय आधारित पीपल काउंटिंग प्रणालीची सुरुवात
शिर्डीत एआय आधारित पीपल काउंटिंग प्रणालीची सुरुवात करण्यात आली आहे. भाविकांसाठी आनंददायक, गुन्हेगारांसाठी धोक्याची बातमी
शिर्डी : साईबाबांच्या दर्शनासाठी दररोज लाखो भाविक शिर्डीत दाखल होतात. या भाविकांच्या सुरक्षेसोबतच दर्शन व्यवस्थापन अधिक कार्यक्षम करण्याच्या दृष्टीने आता साईबाबा मंदिर परिसरात अत्याधुनिक एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) आधारित पीपल काउंटिंग प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे.
गर्दीवर अचूक नजर
या प्रणालीच्या सहाय्याने मंदिर परिसरात नेमके किती भाविक उपस्थित आहेत, कोणत्या भागात गर्दी जास्त आहे याची तत्काळ माहिती मिळणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत गर्दी नियंत्रण अधिक सुलभ होणार असून भाविकांना सुरक्षित वातावरणात दर्शनाचा लाभ घेता येईल.
प्रिझ्मा एआयची देणगी
मुंबईस्थित प्रिझ्मा एआय कंपनीनं ही प्रणाली विकसित करून शिर्डी साईबाबा संस्थानला देणगीस्वरूपात प्रदान केली आहे. कंपनीचे अध्यक्ष आणि साईभक्त डॉ. श्रीराम अय्यर यांच्या हस्ते या प्रणालीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर उपस्थित होते.
प्रमुख वैशिष्ट्ये
-
अचूक भाविकसंख्या नोंद : गेट क्रमांक 1, 6, 7, व्हीआयपी गेट, सिटीझन गेट, गावकरी गेट, दिव्यांग गेट, मुखदर्शन गेट आणि नवीन दर्शन रांग येथे प्रणाली कार्यान्वित.
-
गर्दी नियंत्रण : दर्शन प्रक्रियेत गेटनिहाय भाविकांचे विभाजन शक्य.
-
अलर्ट प्रणाली : भाविकाला चक्कर येणे, वस्तू हरवणे किंवा संशयास्पद हालचाली झाल्यास तत्काळ इशारा.
-
फेस डिटेक्शन : संशयित अथवा गुन्हेगारांचा चेहरा ओळखून सुरक्षा यंत्रणेला अलर्ट.
-
डेटाबेस जोडणी : पोलीस स्टेशनचे कॅमेरे आणि पालखी रोड परिसरही पुढील टप्प्यात जोडले जाणार.
भाविकांसाठी फायदे
या प्रणालीमुळे दररोजच्या भाविकसंख्येची शास्त्रशुद्ध आकडेवारी उपलब्ध होईल. भोजन, निवास, प्रसाद वितरण आणि इतर सुविधा अधिक नियोजनबद्धपणे दिल्या जातील. तसेच, दर्शन व्यवस्थापन अधिक वेगवान आणि सुरक्षित होईल.
साईबाबांच्या सेवेसाठी भाविकांकडून सोनं, चांदी आणि मौल्यवान वस्तू अर्पण केल्या जातात. मात्र, पहिल्यांदाच तंत्रज्ञानाच्या स्वरूपात अशी देणगी मिळाल्याने संस्थान प्रशासनानं या उपक्रमाचं विशेष स्वागत केलं आहे.