Mahanagar Palika Election | महानगरपालिका रणधुमाळीत भरत गोगावले शिर्डीत देवदर्शन
महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवार अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असताना मंत्री भरत गोगावले यांनी शिर्डीत साईबाबांचे सहपरिवार दर्शन घेतले. २ जानेवारीपासून १४ जानेवारीपर्यंत प्रचारात राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं. युती, स्वबळ, जातीपातीचं राजकारण, संजय राऊत यांच्यावर टीका आणि रायगड हत्या प्रकरणावर भाष्य करत त्यांनी महायुतीच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला.
शिर्डी | महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवार अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असून, या पार्श्वभूमीवर राज्याचे मंत्री भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी आज शिर्डीत येऊन साईबाबांच्या (Shirdi Sai Baba) समाधीचे सहपरिवार दर्शन घेतले. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी एक दिवस आणि अर्ज छाननीसाठी एक दिवस जाणार असल्याने त्यानंतर थेट प्रचारात उतरण्यापूर्वी मंत्री गोगावले देवदर्शन करत असल्याचं त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं.
मंत्री भरत गोगावले यांनी सांगितलं की, 2 जानेवारीपासून 14 जानेवारीपर्यंत ते पूर्ण वेळ प्रचारात असणार आहेत. दरवर्षी न चुकता साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येणारे गोगावले यावेळी साई दर्शनानंतर शनि शिंगणापूर, तुळजापूर, पंढरपूर आणि नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी कोल्हापूर येथील महालक्ष्मी देवीचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर २ जानेवारीपासून ते प्रत्यक्ष प्रचारात उतरतील.
यावेळी माध्यमांशी बोलताना मंत्री गोगावले म्हणाले,
“मी देवाकडे दरवेळी मागतो, आजपर्यंत कधीही अपयश आलं नाही. नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेला कशा पद्धतीने यश मिळालं, ते आपण सर्वांनी पाहिलं आहे. तसंच यश महानगरपालिका (Municipal Corporation Elections) आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्येही शिवसेनेलाच मिळणार आहे,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
युतीच्या राजकारणावर भाष्य
महानगरपालिका निवडणुकीत अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप एकत्र येताना दिसत असताना, काही ठिकाणी भाजप आणि शिवसेना यांची युती झालेली नाही, यावर बोलताना गोगावले म्हणाले,
“प्रत्येक पक्षाची ताकद वेगवेगळी आहे. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवलीसारख्या ठिकाणी युती जुळली आहे. ज्यांची ताकद जास्त आहे, ते जास्त जागा मागणारच. जिथे युती होईल तिथे आम्ही एकत्र लढू, आणि जिथे युती होणार नाही तिथे मैत्रीपूर्ण स्वबळावर लढू,” असं त्यांनी स्पष्ट केलं.
नवी मुंबईतील राजकीय समीकरणांवर बोलताना ते म्हणाले की,
“आमची ताकद नवी मुंबईत आहे. आमचा एक खासदार आहे, भाजपाचे दोन आमदार आहेत. मागील निवडणुकीत 42-54 असा फॉर्म्युला होता. यावेळी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली युती होण्याची शक्यता होती. युती झाली नाही, तर आम्ही स्वबळावर लढू,” असंही त्यांनी सांगितलं.
संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करताना मंत्री गोगावले म्हणाले,
“खालच्या थरावर टीका करण्याशिवाय संजय राऊतला (Sanjay Raut Criticism) कोण ओळखणार? त्यांची अवस्था दिवसेंदिवस वाईट होत चालली आहे. पुढे याहूनही जास्त दुरावस्था होणार आहे. आम्ही प्रामाणिक काम करतो. जिथे आम्ही चुकतो, तिथे आम्हाला सांगा, आम्ही मागे जाऊ. पण जिथे आम्ही चुकत नाही, तिथे झुकणार नाही,” असा टोला त्यांनी लगावला.
जातीपातीच्या राजकारणावर निशाणा
उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना गोगावले म्हणाले,
“जातीपातीचं राजकारण शिवसेनेनं कधीच केलं नाही आणि करणारही नाही. आम्ही सर्वांना सोबत घेऊन चालतो. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातही सर्व भाषिक आणि समाज घटक शिवसेनेसोबत होते. पण आता विरोधक काही लोकांना फक्त स्वार्थासाठी सोबत घेत आहेत,” अशी टीका त्यांनी केली.
रायगड हत्या प्रकरणावर प्रतिक्रिया
रायगड येथील हत्या प्रकरणावर (Raigad Murder Case) बोलताना मंत्री गोगावले म्हणाले,
“काही लोकांना पराभव पचवता येत नाही. हत्या झालेल्या व्यक्तीचा काय दोष होता? आरोपींनी स्वतः सांगितलं की आम्हाला दोनवेळा हरवलं. पराभव पचवता येत नसेल तर निवडणुकीत उभं राहू नये. हत्या करणं कधीच योग्य ठरू शकत नाही. नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना समजून सांगणं गरजेचं आहे,” असं ते म्हणाले.
राष्ट्रवादी एकत्र येण्यावर भाष्य
दोन्ही राष्ट्रवादी पक्ष काही ठिकाणी एकत्र येत असल्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना गोगावले म्हणाले,
“काही ठिकाणी त्यांच्याकडे पर्याय नसेल तर ते एकत्र येऊ शकतात. दोन राष्ट्रवादी किंवा तिघेही एकत्र येऊ शकतात. मात्र आम्ही शिवसेना-भाजप खांद्याला खांदा लावून काम करतो. महानगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सभा होतील, तशाच महायुतीच्याही सभा होतील. आम्ही काम केलंय आणि त्याचा मोबदला मागतोय. विरोधक घरात बसून फक्त टीका करत आहेत,” अशी टीका त्यांनी महाविकास आघाडीवर केली.