Shirdi Hospital News | शिर्डीत कोट्यवधींचं दान, पण साईनाथ रुग्णालयात रुग्ण दमतोय रांगेतच !

शिर्डीच्या साईबाबांच्या चरणी दररोज कोट्यवधींचं दान अर्पण होत असताना, साईबाबांच्या नावानं चालवण्यात येणाऱ्या साईनाथ धर्मादाय रुग्णालयात रुग्णसेवेची अवस्था अत्यंत दयनीय असल्याचं चित्र समोर आलं आहे. स्वस्त उपचाराच्या आशेने आलेल्या रुग्णांना केवळ केसपेपरसाठी दोन ते अडीच तास रांगेत उभं राहावं लागत आहे. कोट्यवधींचा आरोग्य निधी, मोठा कर्मचारीवर्ग आणि डॉक्टर उपलब्ध असतानाही रुग्णसेवा रांगांच्या गराड्यात अडकली असून, व्यवस्थेच्या उदासीनतेवर गंभीर सवाल उपस्थित होत आहेत.

Jan 15, 2026 - 21:03
Shirdi Hospital News | शिर्डीत कोट्यवधींचं दान, पण साईनाथ रुग्णालयात रुग्ण दमतोय रांगेतच !
शिर्डीत कोट्यवधींचं दान, पण साईनाथ रुग्णालयात रुग्ण दमतोय रांगेतच

Shirdi Hospital News | शिर्डीच्या साईबाबांच्या (Shirdi Sai baba Donation) चरणी दररोज कोट्यवधी रुपयांचं दान अर्पण केलं जातं. देश-विदेशातून लाखो भाविक श्रद्धेने साईबाबांच्या झोळीत दान देतात. मात्र त्याच साईबाबांच्या नावानं चालवण्यात येणाऱ्या साईनाथ धर्मादाय रुग्णालयात रुग्णसेवेची अवस्था अत्यंत चिंताजनक असल्याचं चित्र समोर आलं आहे. स्वस्त उपचाराच्या आशेने आलेला रुग्ण उपचार मिळण्याआधीच रांगेत दमतोय, तर व्यवस्थेची उदासीनता त्याच्या वेदनांवर मीठ चोळत असल्याचं वास्तव दिसून येत आहे.

राज्यभरातील गोरगरीब आणि गरजू रुग्णांचा आधार असलेलं शिर्डीचं साईनाथ धर्मादाय रुग्णालय (Shirdi Sainath Hospital) आज रुग्णसेवेपेक्षा ‘रांगांसाठी’ अधिक ओळखलं जात आहे. केवळ केसपेपर काढण्यासाठी दोन ते अडीच तास रुग्णांना ताटकळत उभं राहावं लागत आहे. विशेषतः वृद्ध, आजारी, अशक्त आणि गंभीर रुग्णांसाठी ही रांग म्हणजे उपचार नव्हे, तर एक प्रकारची शिक्षा ठरत असल्याचं चित्र आहे.

साईबाबा संस्थानच्या वतीनं शिर्डीत दोन धर्मादाय रुग्णालयं चालवली जातात. एक म्हणजे अत्याधुनिक सुविधा असलेलं साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि दुसरं म्हणजे द्वारावती धर्मशाळेजवळील साईनाथ धर्मादाय रुग्णालय. अल्पदरात उपचार देणारं हे साईनाथ रुग्णालय आज प्रशासनाच्या अपयशाचं जिवंत उदाहरण ठरत असल्याची भावना रुग्णांकडून व्यक्त होत आहे.

या रुग्णालयात तब्बल तीनशेहून अधिक कर्मचारी आणि पन्नासपेक्षा जास्त डॉक्टर कार्यरत आहेत. चार इमारतींमध्ये विविध आजारांवर उपचाराची सुविधा उपलब्ध असतानाही प्रत्यक्षात रुग्णसेवा मात्र रांगेच्या गराड्यात अडकलेली दिसतेय, ही बाब निश्चितच गंभीर आहे.

साईनाथ धर्मादाय रुग्णालयातील रुग्णसेवेचं विदारक वास्तव

पूर्वी दहा रुपयांत मिळणारी वैद्यकीय सेवा आता पन्नास रुपयांपर्यंत पोहोचली आहे. दुबार तपासणीसाठी पंचवीस रुपये आकारले जात आहेत. तरीही राज्यभरातून हजारो गरजू रुग्ण येथे उपचारासाठी येतात. यामागचं एकमेव कारण म्हणजे स्वस्त उपचार आणि साईबाबांवरील अढळ श्रद्धा. मात्र ही श्रद्धा आज व्यवस्थेच्या हलगर्जीपणामुळे तुटतेय का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सध्या रुग्ण नोंदणीसाठी केवळ पाच खिडक्या सुरू आहेत. दिवसभरात एक हजाराहून अधिक बाह्यरुग्णांची नोंदणी होत असताना या पाच खिडक्यांवर प्रचंड ताण येत आहे. परिणामी, केसपेपरसाठी रांग, डॉक्टर तपासणीसाठी रांग, चॅरिटी तपासणीसाठी रांग आणि मोफत औषधांसाठीही स्वतंत्र रांग असा अखंड प्रवास रुग्णांच्या नशिबी येत आहे.

साईबाबांच्या दवाखान्यात गुण पडतो, बाहेर पडवत नाही. स्वस्त उपचार आणि मोफत औषधं मिळतात म्हणून लांबून आलो. पण केवळ केसपेपर काढायलाच दोन तास लागले,” अशी संतप्त प्रतिक्रिया अनेक रुग्ण व्यक्त करत आहेत. उपचार स्वस्त असले तरी वेळेची, आरोग्याची आणि माणुसकीची किंमत इथे रुग्णांना मोजावी लागत असल्याचं वास्तव आहे.

कोट्यावधीचा निधी, मात्र रुग्ण रांगेत

कोट्यवधींचा आरोग्य निधी उपलब्ध असताना पुरेसे कर्मचारी का भरले जात नाहीत? रुग्ण नोंदणीसाठी खिडक्यांची संख्या वाढवली जात नाही का? वृद्ध आणि गंभीर रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था का नाही? आज सर्वत्र हायटेक सुविधा उपलब्ध असताना एका क्लिकवर संबंधित विभागाकडे माहिती पाठवता येते, मग येथे रांगांचाच फार्स का सुरू आहे? असे प्रश्न आता केवळ रुग्णांचे राहिले नसून संपूर्ण व्यवस्थेवरचे आरोप ठरत आहेत.

सबका मालिक एक” हा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या संस्थाननं आता “सबका इलाज वेळेत” हा वसा प्रत्यक्षात उतरवणं गरजेचं आहे. अन्यथा, कोट्यवधींच्या दानाच्या सावलीत रुग्णांची होणारी ही फरफट साईबाबांच्या सेवेलाच तडा देणारी ठरेल, हे प्रशासनानं वेळीच ओळखणं अत्यावश्यक आहे.

Manish Manish Dawange is a passionate journalist dedicated to truthful, people-centric reporting. He focuses on ground realities, social issues, and impactful stories that give voice to the unheard.