Shirdi Beggars News | शिर्डीत पुन्हा इंग्रजी बोलणारा भिक्षेकरी पकडला, काय आहे कहानी वाचा..!
शिर्डीत साईबाबा पुण्यतिथी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची भिक्षेकरी धरपकड मोहीम राबवली. या कारवाईत इंग्रजी बोलणारा उच्चशिक्षित युवक गणेश पिल्ले ताब्यात; याआधी पोलीस व इस्रो अधिकारीही आढळले होते.
शिर्डी : साईबाबांच्या पुण्यतिथी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिर्डी प्रशासनाने भिक्षेकऱ्यांविरोधात विशेष मोहीम हाती घेतली. सोमवार, 30 सप्टेंबर रोजी राबविण्यात आलेल्या या मोहिमेत अनेक भिक्षेकरी ताब्यात घेण्यात आले. त्यात पुन्हा एकदा सफाईदार इंग्रजी बोलणारा भिक्षेकरी आढळल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
सदर व्यक्तीचे नाव गणेश पिल्ले असून, तो मूळचा केरळचा रहिवासी आहे आणि सध्या मुंबईत वास्तव्यास आहे. उच्चशिक्षित पिल्ले यांची नोकरी कोरोना काळात गेल्यामुळे त्यांना भिक मागण्याची वेळ आली. कामाच्या शोधात दिल्लीहून रेल्वेने तो शिर्डीत आला असताना प्रशासनाने त्याला ताब्यात घेतले.
गणेश पिल्ले यांने माध्यमांशी बोलताना सांगितले की, “मी भिकारी नाही. मी एनजीओच्या माध्यमातून कामाच्या शोधात शिर्डीत आलो आहे. नोकरीच्या शोधासाठी प्रयत्नशील आहे.”
मागील मोहिमेत पोलीस अधिकारी, इस्रो अधिकारीही
शिर्डीत दर तीन-चार महिन्यांनी भिक्षेकरी धरपकड मोहीम राबवली जाते. याआधी झालेल्या मोहिमेत माजी पोलीस अधिकारी, इस्रोचे माजी अधिकारी असे वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक भिक्षा मागताना आढळून आले होते. याच मोहिमेत तिघा भिक्षेकऱ्यांचा मृत्यू झाल्याने प्रशासनाने आता अधिक खबरदारी घेत मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे.
प्रशासनाच्या या कारवाईमुळे शिर्डीत भिक्षेकऱ्यांचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.