Sujay Vikhe Patil | “दोन दिवस द्या… वरात काढतो!” – शिर्डीतील गुंडांवर सुजय विखे पाटलांचा तडाखेबंद हल्लाबोल
शिर्डीतील वाढत्या गुन्हेगारीवरून भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी नगरसेवकांना आणि कुख्यात गुंडांना तडाखेबंद इशारा दिला आहे. समाजमाध्यमांवर व्हायरल झालेल्या गुंडांच्या रील्सवर संताप व्यक्त करत, गुंडांबरोबर दिसलात तर खपवून घेतलं जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. ड्रग्ज माफियावरून सुरू असलेल्या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सर्व पक्षीयांनी गुन्हेगारीविरोधात एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे.
शिर्डी : भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी शिर्डीतील वाढत्या गुन्हेगारीवरून (Shirdi Crime) थेट आणि तडाखेबंद भूमिका घेत नगरसेवकांना स्पष्ट इशारा दिला आहे. “गुंडांबरोबर दिसलात, तर खपवून घेतलं जाणार नाही” असा ठाम इशारा देताना, समाजमाध्यमांवर व्हायरल झालेल्या काही गुंडांच्या रील्सवरही त्यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे (BJP Vikhe Patil statement) शिर्डीच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
शिर्डी दौऱ्यावर असताना कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सुजय विखे पाटील यांनी गुंडगिरीवर आक्रमक शब्दांत टीका केली. “फक्त दोन दिवस द्या, या सर्वांचा कपडे काढून शिर्डीत वरात काढतो,” असा थेट इशारा देत त्यांनी गुन्हेगारांना उघड आव्हान दिलं.
दरम्यान, अहिल्यानगर जिल्ह्यातील ड्रग्ज माफियावरून (Ahmednagar drug mafia) राजकारण तापलं असून, खासदार नीलेश लंके आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्यात आरोप-प्रत्यारोपांची जोरदार (Nilesh Lanke vs Vikhe Patil) फेरी सुरू आहे. दोन्ही बाजूंकडून एकमेकांचे नेते आणि कार्यकर्ते ड्रग्ज तस्करांबरोबर असल्याचे फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल केले जात असून, त्यातून गुन्हेगारीचे राजकीय संबंध पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
या पार्श्वभूमीवर विखे पाटील यांनी शिर्डीतील नगरसेवकांना खडसावत सांगितले की, “कार्यकर्ता कोणाचाही असो, गुंडगर्दी किंवा गुन्हेगारांबरोबर दिसलात, तर आता टॉलरन्स लेव्हल संपली आहे. सर्व नगरसेवकांची ही सामूहिक जबाबदारी आहे.”
शिर्डीच्या विकासासाठी सर्व पक्षीयांनी एकत्र यावं, असं आवाहन करताना त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं, “गुन्हेगार चाकू मारताना विचार करत नाही, तो भाजपचा आहे की सेनेचा, राष्ट्रवादीचा आहे की कमळाचा. तो चाकू मारणारच. त्यामुळे या गुन्हेगारांविरोधात सर्व पक्षांनी एकत्र येऊन मूठ बांधली पाहिजे.”
तसंच, “जेवढे गुन्हेगार कार्यकर्ते असतील, त्यांना तात्काळ लांब करा. सुधारणा झाली नाही, तर थेट शिर्डीतून हद्दपार केलं जाईल. मतदानासाठी लाचारी पत्करणार नाही. शिर्डी सुरक्षित राहील, महिला आणि मुली सुरक्षित राहतील. विधानसभेला आणि नगरपालिकांना दिलेला शब्द मी पूर्ण करणार,” असा निर्धारही सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे.