Ajit Pawar plane crash | अजित पवार विमान अपघात अपडेट; ‘त्या’ २६ मिनिटांत काय घडले ?
नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने विमानाचा अपघात होण्याआधी 26 मिनिटे काय झालं ? याचा घटनाक्रम दिला आहे. सकाळी 8 वाजून 18 मिनिटाला विमान पहिल्यांदा ‘बारामतीच्या संपर्कात’ आले. त्यानंतर 8 वाजून 44 मिनिटाला विमानाचा अपघात होऊन मोठा स्फोट झाला.
AJIT PAWAR | मुंबई ते बारामती अवघ्या 35 मिनिटांचा प्रवास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी (Ajit Pawar Plane Crash) अखेरचा ठरला. बुधवारी (28 जानेवारी 2026) सकाळी मुंबईहून बारामतीकडे निघालेले लिअरजेट-45 हे चार्टर्ड विमान बारामती विमानतळावर लँडिंगदरम्यान झालेल्या भीषण अपघातात कोसळले. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह विमानातील सर्व पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
अजित पवार (Maharashtra Deputy CM Ajit Pawar) प्रवास करत असलेले VT-SSK नोंदणी क्रमांकाचे हे विमान (VT-SSK Aircraft) दिल्लीस्थित VSR व्हेन्चर्स कंपनीच्या मालकीचे होते. विमानाने सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केले होते. मात्र सकाळी 8 वाजून 44 मिनिटाला बारामती विमानतळ परिसरात लँडिंग करताना विमानाचा स्फोटासह अपघात झाला.
बारामती विमानतळावर लँडिंग का अवघड?
नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या माहितीनुसार, बारामती विमानतळ हे ‘अनकंट्रोल्ड एअरफिल्ड’ आहे. येथे एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) टॉवर नाही. कमी दृश्यमानतेत वैमानिकांना मार्गदर्शन करणारी अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध नसल्यामुळे लँडिंग करताना संपूर्ण जबाबदारी वैमानिकावरच असते. मुख्यतः वैमानिक प्रशिक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या या धावपट्टीवर खासगी विमानांचेही लँडिंग होते.
अपघाताआधी 26 मिनिटांत काय घडले?
मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, विमान सकाळी 8 वाजून 18 मिनिटांनी पहिल्यांदा बारामती विमानतळाच्या संपर्कात आले. वैमानिकाने परिसरातील हवा आणि दृश्यमानतेबाबत चौकशी केली असता दृश्यमानता 3000 मीटर असल्याचे सांगण्यात आले.
पहिल्या लँडिंगच्या प्रयत्नात धावपट्टी न दिसल्यामुळे वैमानिकाने लँडिंग रद्द केले. त्यानंतर विमानाने विमानतळाभोवती एक फेरी मारून दुसरा प्रयत्न केला. Flightradar24 नुसार विमानाने गोल चक्कर मारल्याचे स्पष्ट झाले आहे.
दुसऱ्या प्रयत्नात ‘रनवे 11’वर लँडिंग करत असल्याचा अंतिम कॉल देण्यात आला. सुरुवातीला “धावपट्टी दिसत नाही” असे सांगून काही क्षणांतच धावपट्टी दिसत असल्याचे क्रूने कळवले. त्यानंतर सकाळी 8 वाजून 43 मिनिटांनी लँडिंगची परवानगी देण्यात आली. मात्र त्यानंतर विमानाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
भीषण स्फोट आणि आगीचा लोट
सकाळी 8 वाजून 44 मिनिटाला रनवे ११ च्या सुरुवातीच्या भागात मोठा आगीचा लोट दिसून आला. तत्काळ आपत्कालीन यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली, मात्र तोपर्यंत सर्वांचे प्राण गेले होते.
AAIB कडून तपास सुरू
या अपघाताचा तपास विमान अपघात अन्वेषण ब्युरो (AAIB) करत आहे. AAIB चे अधिकारी दिल्लीहून घटनास्थळी दाखल झाले असून, डायरेक्टर जनरल जी.व्ही.जी. युगंधर हेही हैदराबादहून बारामतीत पोहोचले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, कमी दृश्यमानता हे अपघाताचे प्रमुख कारण असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.