Ahilyanagar Crime | चार बहिणींवर लैंगिक अत्याचार प्रकरणानं राहुरी हदरलं; जिल्ह्यात खळबळ
अहिल्यानगर जिल्ह्यात राहुरी तालुक्यात नराधम नातेवाईकाने चार बहिणींवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली. स्नेहालय संस्थेच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी दांपत्याला अटक करून चौघी मुलींची सुटका केली आहे.
Ahilyanagar Crime : राहुरी तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी संतापजनक घटना उघडकीस आली आहे. एका नराधम नातेवाईकाने एकाच कुटुंबातील चार बहिणींवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचं धक्कादायक वास्तव तपासात समोर आलं आहे. या प्रकरणी राहुरी पोलिसांनी ( (ahilyanagar Crime News) आरोपीसह त्याच्या पत्नीला अटक केली असून, त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आई-वडील विभक्त झाल्यानंतर या बहिणींची जबाबदारी त्यांच्या लांबच्या नातेवाईकाकडे सोपवण्यात आली होती. मात्र, रक्षणकर्त्याच्या भूमिकेत असलेल्या याच नातेवाईकानेच भक्षकाचं रूप धारण करून त्यांच्यावर वारंवार अत्याचार केले.
स्नेहालयच्या धाडसामुळे उघडकीस आलं संतापजनक वास्तव
या संतापजनक प्रकरणाचा पर्दाफाश स्नेहालय संस्थेच्या उडान प्रकल्पाच्या कार्यकर्त्यांनी केला. पीडित बहिणींपैकी सज्ञान असलेली एक मुलगी काही दिवसांपूर्वी बहिणींना भेटण्यासाठी आली होती. यावेळी आरोपीने तिच्यावर पुन्हा अत्याचार केला. पीडितेने हा प्रसंग आपल्या पतीला सांगितल्यानंतर दोघांनी स्नेहालय संस्थेशी संपर्क साधला. संस्थेच्या कार्यकर्त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिल्यानंतर राहुरी पोलिसांनी चौघी मुलींची सुटका करत आरोपी दांपत्याला बेड्या ठोकल्या.
लग्न झालेल्या बहिणीच्या धाडसामुळे आरोपीच्या कृत्याचा भांडाफोड
पीडित मुली नाशिक जिल्ह्यातील असून, त्यापैकी तिघी अल्पवयीन आहेत. त्या अनुक्रमे 16,14 आणि 10 वर्षांच्या आहेत, तर मोठी मुलगी सज्ञान असून तिचं लग्न चार महिन्यांपूर्वी झालं आहे. तपासात उघड झालं की, आरोपीने केवळ या विवाहित मुलीवरच नव्हे तर तिच्या तीन अल्पवयीन बहिणींवरही अनेक वेळा लैंगिक अत्याचार केले होते.
या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून, सामाजिक क्षेत्रातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. आपल्या देखरेखीखाली असलेल्या अल्पवयीन मुलींवर एका नातेवाईकानेच वारंवार अत्याचार करणे ही अत्यंत संतापजनक बाब असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. या गंभीर गुन्ह्याला आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी होत आहे.