शिर्डीत अनंत अंबानींचं साई दर्शन; पाच कोटींची देणगी अर्पण

उद्योगपती अनंत अंबानी यांनी सोमवारी शिर्डीत साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेत संध्याकाळच्या धूप आरतीला उपस्थिती लावली. दर्शनानंतर त्यांनी साईबाबा संस्थानला पाच कोटी रुपयांची देणगी अर्पण केली. यावेळी साई समाधीवर निळ्या रंगाची शाल अर्पण करण्यात आली. नाताळच्या सुट्ट्या आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत देश-विदेशातून साईभक्तांची मोठी गर्दी होत आहे.

Dec 30, 2025 - 20:29
शिर्डीत अनंत अंबानींचं साई दर्शन; पाच कोटींची देणगी अर्पण

शिर्डी | उद्योगपती अनंत अंबानी (Anant Ambani) यांनी सोमवारी शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे (Shirdi Sai Baba) मनोभावे दर्शन घेतले. साईभक्तांसाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या संध्याकाळच्या धूप आरतीला अनंत अंबानी यांनी आवर्जून उपस्थिती लावली. साईबाबांच्या दर्शनानंतर त्यांनी साईबाबा संस्थानला तब्बल पाच कोटी रुपयांची देणगी (Anant Ambani donation) अर्पण केली.

अंबानी कुटुंब हे शिर्डीच्या साईबाबांचे (Sai Baba Sansthan) परमभक्त म्हणून ओळखले जाते. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्यासह संपूर्ण अंबानी कुटुंबाची साईबाबांवर अतूट श्रद्धा आहे. मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी आणि सुपुत्र आकाश अंबानी हे वर्षातून दोन ते तीन वेळा न चुकता शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेत असतात. प्रत्येक वेळी ते साईबाबांच्या समाधीवर निळ्या रंगाची चादर अर्पण करण्याची परंपरा जपत असतात.

मुकेश अंबानी यांचे धाकटे सुपुत्र अनंत अंबानी हे देखील साईबाबांचे निस्सीम भक्त आहेत. यापूर्वी 25 ऑक्टोबर 2022 रोजी त्यांनी शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले होते. त्यावेळी त्यांनी साईबाबांच्या चरणी दीड कोटी रुपयांची देणगी अर्पण केली होती. याच श्रद्धेच्या भावनेतून सोमवारीही अनंत अंबानी यांनी साईबाबांच्या चरणी तब्बल पाच कोटी रुपयांची देणगी अर्पण करत आपली भक्ती व्यक्त केली.

सोमवारी शिर्डीत दाखल झाल्यानंतर अनंत अंबानी यांनी साईबाबांच्या समाधीचे शांततेत दर्शन घेतले. यावेळी त्यांनी साई समाधीवर निळ्या रंगाची शाल अर्पण केली. दर्शनानंतर साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते अनंत अंबानी यांचा साई शाल आणि साईबाबांची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी साईबाबा संस्थानचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

दरम्यान, नाताळच्या सुट्ट्या आणि नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत साईभक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. राज्यासह देशभरातून तसेच परदेशातूनही लाखो भाविक शिर्डीत दाखल झाले आहेत. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन साईबाबा संस्थान प्रशासनाने भाविकांसाठी दर्शन व्यवस्थेसह सर्व सुविधा सज्ज ठेवल्या आहेत.

याचबरोबर मंदिर परिसरात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त तैनात केला आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातूनही संपूर्ण परिसरावर नजर ठेवण्यात येत आहे. साईभक्तांच्या सुरक्षित आणि सुरळीत दर्शनासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.