Karmala News | करमाळ्यात बापचं ठरला कर्दनकाळ; दोन चिमुकल्यांना विहिरीत ढकलून, नंतर असं काही केलं की...
करमाळा तालुक्यातील हिंगणी परिसरात किरकोळ कौटुंबिक वादातून संतापलेल्या वडिलाने आपल्या दोन चिमुकल्या मुलांना विहिरीत ढकलून ठार केल्याची धक्कादायक घटना घडली. मुलांच्या हत्येनंतर आरोपीने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला असून त्याची प्रकृती गंभीर आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
सोलापूर: जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली असून, या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. किरकोळ कौटुंबिक वादातून संतापाच्या भरात एका वडिलाने आपल्या दोन चिमुकल्या मुलांचा निर्दयपणे जीव घेतल्याची हृदयद्रावक घटना करमाळा तालुक्यातील हिंगणी परिसरात (Solapur crime news) घडली आहे.
सुहास ज्ञानदेव जाधव (वय 32, रा. हिंगणी, ता. करमाळा) असे आरोपीचे नाव असून तो महावितरण कंपनीत कर्मचारी म्हणून कार्यरत असल्याची माहिती आहे.
किरकोळ वाद, मानसिक तणाव आणि टोकाचे पाऊल
पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सुहास जाधव याचा घरात काही किरकोळ कारणावरून कुटुंबीयांशी वाद झाला होता. या वादानंतर तो तीव्र मानसिक तणावात असल्याचे सांगण्यात येत आहे. याच मानसिक अस्थिरतेतून त्याने अत्यंत टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.
फिरायला नेतोय म्हणत शेतात नेले अन्…
नेहमीप्रमाणे मुलांना फिरायला नेत असल्याचा बहाणा करत सुहास जाधव याने आपली दोन चिमुकली मुले शिवांश आणि श्रेया (father kills children) यांना करमाळा तालुक्यातील हिंगणी येथील स्वतःच्या शेतात नेले. शेतातील विहिरीजवळ नेऊन काही कळण्याच्या आतच त्याने दोन्ही निष्पाप मुलांना विहिरीत ढकलून दिले.
या अमानुष कृत्यात दोन्ही मुलांचा पाण्यात बुडून (well drowning case) जागीच मृत्यू झाला.
मुलांच्या हत्येनंतर आत्महत्येचा प्रयत्न
मुलांचा जीव घेतल्यानंतर आरोपी सुहास जाधव यानेही (Karmala police) स्वतःचे आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. त्याने शेतातच विषारी औषध प्राशन केले. काही वेळातच त्याची प्रकृती गंभीर झाली.
दरम्यान, या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांना मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. नागरिकांनी तातडीने घटनेची माहिती करमाळा पोलिसांना दिली.
पोलीस घटनास्थळी दाखल, मृतदेह विहिरीतून बाहेर
करमाळा पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी विहिरीतून दोन्ही चिमुकल्यांचे मृतदेह बाहेर काढून पंचनामा केला. विष प्राशन केल्याने गंभीर अवस्थेत असलेल्या सुहास जाधव याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) हलवण्यात आले आहे. सध्या त्याची प्रकृती अत्यवस्थ असल्याची माहिती आहे.
परिसरात शोककळा, तपास सुरू
या घटनेमुळे संपूर्ण हिंगणी परिसरात शोककळा पसरली असून दोन निष्पाप चिमुकल्यांच्या अकाली मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. करमाळा पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून नेमक्या कारणांचा शोध घेतला जात आहे.