Ahilyanagar News राहाता तालुक्यात पोलिसाची मनमानी : दुकानदाराला मारहाण, तक्रार दाखल नाकारली

राहाता तालुक्यातील कोल्हार गावात दुकान बंद करण्याच्या नावाखाली पोलिसाने एका दुकानदाराला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेजही उघड झाले असून मारहाण झाल्यानंतर तक्रार देण्यासाठी पोलिसांकडे गेलेल्या दुकानदाराची तक्रार दाखल करण्यात टाळाटाळ होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

Sep 13, 2025 - 11:10
Sep 14, 2025 - 00:04
Ahilyanagar News राहाता तालुक्यात पोलिसाची मनमानी : दुकानदाराला मारहाण, तक्रार दाखल नाकारली
Ahilyanagar Police Crime

अहिल्यानगर : राहाता तालुक्यातील कोल्हार गावात पोलिसाच्या मनमानीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रात्री दुकान बंद करण्याच्या नावाखाली एका दुकानदाराला पोलिसाने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे, या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले असून मारहाणीच्या प्रकरणी दुकानदाराने पोलिसांकडे तक्रार नोंदवण्यासाठी गेल्यावर, तक्रार दाखल करण्यास पोलिसांनी नकार दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

घटना मंगळवारी रात्री घडली. कोल्हार येथील कैलास पिलगर यांच्या दुकानाजवळ रात्री साडेदहाच्या सुमारास हा प्रकार घडला. काही दिवसांपूर्वी प्रशासनाने सर्व दुकाने रात्री दहा वाजता बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार बहुतांश दुकाने बंद झाली होती. मात्र पिलगर यांच्या केक शॉप बंद करण्यात थोडा उशीर झाला.

दरम्यान, सिव्हिल ड्रेसमधील एक पोलीस कर्मचारी दुकानात आला. त्याने “इतरांचीही दुकाने बंद करायला लावा” असे सांगत अचानक दुकानदाराला मारहाण केली. या घटनेचे फुटेज सीसीटीव्हीमध्ये स्पष्टपणे कैद झाले आहे.

यानंतर मारहाण झालेल्या दुकानदाराने लोणी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी धाव घेतली. परंतु पोलिसांनी तक्रार दाखल करण्यात टाळाटाळ केल्याचा गंभीर आरोप कैलास पिलगर यांनी केला आहे.

या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट पसरली असून पोलिसांकडून न्याय नाकारला जातोय का? असा सवाल स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. संबंधित प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.