Uddhav Thackeray | मुंबई महापालिका निकालावर उद्धव ठाकरे यांची खणखणीत प्रतिक्रिया; भाजप–शिंदे गटावर जोरदार टीका..
मुंबई महापालिका निवडणूक निकालावर उद्धव ठाकरे यांनी जोरदार प्रतिक्रिया देत भाजप आणि शिंदे गटावर टीका केली. “भाजप कागदावर आहे, जमिनीवर नाही” असे म्हणत त्यांनी निवडणूक घाणेरड्या पद्धतीने लढवली गेल्याचा आरोप केला. पैसे वाटप, धमक्या आणि यंत्रणांच्या गैरवापराचे आरोप करत, शिवसेना संपलेली नसून मुंबईकरांचा आशीर्वाद अजूनही आपल्या सोबत असल्याचा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला.
मुंबई : “भाजपने कागदावर शिवसेना संपवली असेल, पण जमिनीवरची शिवसेना संपवू शकत नाही. भाजप कागदावर आहे, जमिनीवर नाही. जर तो जमिनीवर असता तर त्यांना पक्ष फोडावे लागले नसते,” अशा ठाम शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालावर आपली पहिली प्रतिक्रिया (Mumbai Municipal Election Result) दिली. मुंबई महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (BJP Criticism) यांच्यावर जोरदार टीका केली. “आमचा महापौर होईल असा आकडा दिसत नसला तरी कुठेही शिवसैनिक खचलेला नाही. आमच्या पराभवाला तेज आहे, तर त्यांच्या विजयाला डाग आहे. ज्यांच्या आधारावर ते महापौर बसवणार असतील, त्यांना लाज वाटली पाहिजे,” असे ठाकरे म्हणाले.
“निवडणूक घाणेरड्या पद्धतीने लढवली”
उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप करत निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “ही निवडणूक सत्ताधाऱ्यांकडून घाणेरड्या पद्धतीने लढवली गेली. मतदारांना लालूच दाखवण्यात (BMC Result 2026) आली, मोठ्या प्रमाणात पैसे वाटप झाले. आमच्या उमेदवारांना तडीपाराची नोटीस बजावली, काहींना दंगलीचे गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या दिल्या,” असा आरोप त्यांनी केला.
कल्याण–डोंबिवली परिसरात उमेदवारांना माघार घेण्यासाठी धमकावण्यात आल्याचेही ठाकरे यांनी सांगितले. “या सगळ्या दमदाटीला न जुमानता मतदारांनी मतदान केलं, हे महत्त्वाचं आहे,” असे ते म्हणाले.
‘खुर्च्यांची गर्दी मतदान कसं करते?’
सभांवरही ठाकरे यांनी टोला लगावला. “शिवाजी पार्कवर आमची सभा झाली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांच्या सभेत खुर्च्यांची गर्दी होती. खुर्च्या मतदान कसं करू शकतात, याचं हे उत्तम उदाहरण आहे,” असा टोमणा त्यांनी मारला.
पैशांचा मारा आणि यंत्रणांवर सवाल
“मागील चार दिवसांत प्रचंड प्रमाणात पैसे वाटप झाले. काही पदाधिकाऱ्यांना विकास निधीच्या नावाखाली रक्कमा देण्यात आल्या. हा पैसा कुठून येतो? निवडणूक आयोग, ईडी, सीबीआय यांना हे कसं दिसत नाही?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी २०१४ च्या नोटबंदीचा संदर्भ देत काळ्या पैशावरही भाष्य केले.
“मुंबईकरांचा आशीर्वाद अजूनही आमच्यासोबत”
२५ वर्षांच्या महापालिकेतील शिवसेनेच्या (Balasaheb Thackeray) कारकिर्दीचा उल्लेख करत ठाकरे म्हणाले, “आम्ही मुंबईची सेवा केली. कोविड काळात मुंबई मॉडेलची देशभर प्रशंसा झाली. त्यामुळे मला अपेक्षा होती की मुंबईकर अधिक आशीर्वाद देतील. कदाचित मत दिली नसतील, पण मोठ्या प्रमाणात आशीर्वाद अजूनही आहे. मराठी पट्ट्यात शिवसेनेचा हात कायम आहे.”
सभागृहात भांडाफोड करणार
भविष्यातील भूमिकेबाबत स्पष्ट भूमिका मांडताना उद्धव ठाकरे म्हणाले, “शिवसेनेचे लोकप्रतिनिधी सभागृहात जाणार आहेत. सत्ताधाऱ्यांनी कशा प्रकारे भांडाफोड केली, याचा पर्दाफाश आम्ही करणार आहोत. शिवसेना, मनसे आणि पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार एकत्र काम करतील आणि वचननाम्याचा पाठपुरावा केला जाईल.”
“मुंबईची जमीन मुंबईकरांसाठीच”
शेवटी त्यांनी ठाम शब्दांत इशारा दिला, “मुंबईची जमीन ही मुंबईकरांसाठीच वापरली जाईल. मुंबई लुटणाऱ्यांवर सदैव दडपण ठेवण्याचं काम शिवसेना करेल.”
मुंबई महापालिका निकालानंतर उद्धव ठाकरे यांची ही प्रतिक्रिया केवळ राजकीय टीका नसून, आगामी महापालिकेतील राजकारण अधिक तीव्र होण्याचे संकेत देणारी ठरत आहे.