मुंबई महापालिका: भाजप-शिवसेना युतीचा फॉर्म्युला जाहीर; 137-90 जागावाटप
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना यांच्यातील जागावाटपावर अखेर शिक्कामोर्तब झाला आहे. अंतिम फॉर्म्युल्यानुसार भाजप 137 तर शिवसेना 90 जागांवर निवडणूक लढवणार आहे. महायुती 227 जागांवर एकत्र निवडणूक लढवून 150 हून अधिक जागांवर विजय मिळवेल, असा विश्वास नेत्यांनी व्यक्त केला आहे.
Mumbai Mahanagar Palika | मुंबई महापालिका निवडणुकीसाठी (Mumbai Municipal Corporation) भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना यांच्यातील युतीच्या जागावाटपावर (Seat Sharing Formula) अखेर शिक्कामोर्तब झालं आहे. सोमवारी (29 डिसेंबर) रात्री उशिरापर्यंत झालेल्या बैठकीनंतर जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला निश्चित करण्यात आला. त्यानुसार भाजप 137 जागांवर, तर शिवसेना 90 जागांवर निवडणूक लढवणार आहे.
भाजपाच्या वाट्याला 137 जागा
राज्यातील सत्ताधारी भाजप, शिवसेना आणि रिपब्लिकन पक्ष ऑफ इंडिया (आरपीआय) यांच्यासह महायुतीतील (BJP Shiv Sena Alliance) जागावाटपाची चर्चा पूर्ण झाल्याची माहिती भाजपाचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
अमित साटम म्हणाले की, यापूर्वी 207 जागांवर चर्चा झाली होती. मात्र, आता मुंबई महापालिकेच्या एकूण 227 जागांवर अंतिम चर्चा पूर्ण झाली आहे. त्यानुसार भाजप 137 जागांवर निवडणूक लढवेल, तर शिवसेना 90 जागांवर निवडणूक लढवेल. महायुतीतील मित्र पक्षांचाही समावेश याच २२७ जागांमध्ये करण्यात आला आहे.
भाजपाच्या वाट्याला एकट्याच्या 137 जागा आल्या असून, शिवसेनेच्या 90 जागांमध्ये महायुतीतील इतर मित्र पक्षांना सामावून घेतलं जाणार असल्याचंही अमित साटम यांनी स्पष्ट केलं. जागावाटपाबाबत कोणतीही नाराजी नसून, सर्व घटक पक्षांना समाधानकारक जागा देण्यासाठी वेळ लागल्याचं त्यांनी सांगितलं.
‘90 जागांवर आम्ही समाधानी’ – राहुल शेवाळे
दरम्यान, शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी 90 जागांवर समाधान व्यक्त केलं आहे. भाजपासोबत झालेली जागावाटपाची चर्चा सकारात्मक झाली असून, योग्य आणि समतोल फॉर्म्युला ठरवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
“227 जागांवर महायुतीचे उमेदवार एकत्र निवडणूक लढवतील आणि 150 पेक्षा अधिक जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होतील,” असा विश्वास शेवाळे यांनी व्यक्त केला.
‘महापौर महायुतीचाच’
मुंबई महापालिकेत ( BMC Elections) महायुतीचाच मराठी महापौर होणार, ही काळ्या दगडावरची रेघ असल्याचंही राहुल शेवाळे म्हणाले. महायुतीतील सर्व घटक पक्षांमध्ये एकवाक्यता असून कोणताही मतभेद नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. रिपब्लिकन सेनेला किती जागा दिल्या जाणार, याचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील, असंही त्यांनी सांगितलं.
‘विकासाच्या मुद्यावर निवडणूक’
महायुती विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणार असल्याचं सांगताना शेवाळे म्हणाले,
“राज्य आणि केंद्रात महायुतीची सत्ता आहे. मुंबईतही महायुतीची सत्ता आली तरच शहराचा सर्वांगीण विकास शक्य आहे, हा विश्वास मुंबईकरांच्या मनात आहे,” असं ते म्हणाले.
ठाण्यातही युती कायम
ठाणे महापालिकेतही भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना एकत्र निवडणूक लढवणार आहे. ठाण्यातील जागावाटपात शिवसेना 87 तर भाजप 40 जागांवर निवडणूक लढवणार असल्याची माहिती आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अवघा एक दिवस शिल्लक असताना, अखेर भाजप-शिवसेनेतील जागावाटप निश्चित झालं आहे.