Shirdi News | अबब..! शिर्डी साईंच्या झोळीत 23.29 कोटींचे महादान; मागील सर्व रेकॉर्ड ब्रेक..
नाताळ व नववर्षाच्या नऊ दिवसांत शिर्डीत सुमारे आठ लाख भाविकांनी साईबाबांचे दर्शन घेतले. या काळात 23 कोटी 29 लाख रुपयांचे विक्रमी दान जमा झाले असून, 2025 च्या तुलनेत भाविक व दानात दीडपट वाढ नोंदली आहे.
Shirdi Sai Temple Donation : नाताळच्या सुट्ट्या आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीतील साईबाबा मंदिरात भाविकांची अभूतपूर्व गर्दी पाहायला मिळाली. 25 डिसेंबर ते 2 जानेवारी या नऊ दिवसांच्या कालावधीत सुमारे आठ लाख भाविकांनी साईसमाधीचे दर्शन घेतले. या कालावधीत भाविकांकडून 23 कोटी 29 लाख 23 हजार 373 रुपयांचे महादान साईबाबांच्या चरणी अर्पण करण्यात आले असून, हा आकडा गतवर्षीच्या तुलनेत विक्रमी ठरला आहे.
साईसंस्थानच्या वतीने नाताळ व नववर्षानिमित्त ‘शिर्डी महोत्सव’ आयोजित करण्यात आला होता. नाताळच्या पहिल्या दिवसापासूनच शिर्डीत भाविकांची लक्षणीय गर्दी झाली. देशासह परदेशातील भाविकांनीही साईबाबांच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावली.
दानाची अधिकृत आकडेवारी जाहीर
नऊ दिवसांच्या सुट्ट्यांतील दानाची मोजदाद पूर्ण झाल्यानंतर साईसंस्थानने अधिकृत आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार—
-
देणगी काउंटरवरून: 3 कोटी 22 लाख 43 हजार 388 रुपये
-
मंदिरातील दानपेटीतून: 6 कोटी 02 लाख 61 हजार 006 रुपये
-
ऑनलाइन, चेक, डीडी, मनीऑर्डरद्वारे: 10 कोटी 18 लाख 86 हजार 955 रुपये
-
सशुल्क दर्शन पासमधून: 2 कोटी 42 लाख 60 हजार रुपये
-
सोनं: 36 लाख 38 हजार 610 रुपये
-
चांदी: 9 लाख 49 हजार 741 रुपये
-
26 देशांतील परकीय चलन: 16 लाख 83 हजार 673 रुपये
याशिवाय नववर्षाच्या निमित्ताने सुवर्ण व हिरे जडित सुमारे 80 लाख रुपयांचा मुकुट साईबाबांना भेट स्वरूपात अर्पण करण्यात आला आहे.
प्रसाद, निवास आणि सुविधा यांनाही मोठा प्रतिसाद
या कालावधीत साईबाबा प्रसादालयात साडे सहा लाख भाविकांनी भोजन घेतले, तर साडे चौदा लाख लाडू प्रसादाची विक्री झाली. साईसंस्थानच्या विविध निवासस्थानी 1 लाख 39 हजार 140 भाविकांनी निवारा घेतला.
गतवर्षीपेक्षा दीडपट वाढ
एकंदरीत नाताळ सुट्ट्या व नववर्ष 2026 निमित्त झालेल्या शिर्डी महोत्सवात 2025 च्या तुलनेत सुमारे दीडपट वाढ झाल्याचे चित्र आहे.
साईसंस्थानची आर्थिक स्थिती भक्कम
साईसंस्थानच्या विविध बँकांमध्ये सुमारे 3,328 कोटी रुपयांच्या ठेवी असून, त्यावर दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे व्याज प्राप्त होते. संस्थानकडे सुमारे 540 किलो सोनं आणि सात हजार किलो चांदी आहे.
मिळालेल्या दानातून साईसंस्थानच्या वतीने दोन धर्मदाय रुग्णालये, शैक्षणिक संकुले, भाविकांच्या सोयी-सुविधा, कर्मचाऱ्यांचे वेतन तसेच शिर्डीतील विविध विकासकामांवर खर्च केला जातो.
साईबाबा नवसाला पावतात, मनोकामना पूर्ण करतात या श्रद्धेने भाविक साईचरणी नतमस्तक होत असून, रुपयापासून ते कोट्यवधींच्या दानापर्यंत भक्तीभावाने दान अर्पण करत असल्याचे चित्र यंदाही शिर्डीत दिसून आले.