Ahilyanagar Leopard | जीव मुठीत धरून ऊसतोड: बिबट्यांच्या दहशतीत मजुरांचं काम.

अहिल्यानगर जिल्ह्यात साखर कारखान्यांचा ( Suger Factory) गळीत हंगाम सुरू झाल्यानंतर ऊसतोडीला वेग आला आहे. यामुळे ऊसशेतीत राहणाऱ्या बिबट्यांचा नैसर्गिक निवारा नष्ट होत असून ते मानवी वस्तीकडे येऊ लागले आहेत. राहुरी आणि श्रीरामपूर (Rahuri Shrirampur) तालुक्यांत बिबट्यांचा (Leopard Attack) वावर वाढला असून ऊसतोड मजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Dec 27, 2025 - 15:37
Ahilyanagar Leopard | जीव मुठीत धरून ऊसतोड: बिबट्यांच्या दहशतीत मजुरांचं काम.

अहिल्यानगर | जिल्ह्यात साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाल्यानंतर ऊसतोडणीला मोठ्या प्रमाणात वेग आला आहे. जिल्ह्यातील अनेक कारखान्यांचे बॉयलर पेटले असून गाळप प्रक्रिया जोमात सुरू आहे. मात्र, याच ऊसतोडीचा थेट परिणाम आता वन्यजीवांवर, विशेषतः बिबट्यांवर होत (Maharashtra leopard news) असल्याचे स्पष्ट चित्र समोर येत आहे. शेतातील ऊस कमी होत चालल्याने बिबट्यांचा नैसर्गिक निवारा नष्ट होत असून त्यामुळे बिबटे (Leopard attack) ऊसातून बाहेर पडत मानवी वस्तीकडे वळू लागले आहेत. परिणामी, ऊसतोड मजूर आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

राहुरी–श्रीरामपूर भागात बिबट्यांचा मोठा वावर

राहुरी आणि श्रीरामपूर तालुक्यातील शेकडो हेक्टर क्षेत्रातील ऊस सध्या तोडणीला आला आहे. ऊसशेतीत दाट आच्छादन, पाण्याची उपलब्धता आणि शांत वातावरण असल्याने बिबट्यांना लपण्यासाठी, विश्रांतीसाठी तसेच प्रजननासाठी हा परिसर अनुकूल ठरतो. त्यामुळे या भागात गेल्या काही वर्षांपासून बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. मात्र, ऊसतोड सुरू झाल्यानंतर हे नैसर्गिक आडोसे नष्ट होत असून बिबटे शेताबाहेर पडत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसून येत आहे. ऊसतोड चालू असतानाच बिबट्यांचे दर्शन झाल्याच्या घटना वाढल्या असून जीव मुठीत धरून मजूर ऊसतोडीचे काम करत आहेत.

बिबट्यांची संख्या वाढली, मानवी हस्तक्षेप कारणीभूत

अहिल्यानगर जिल्ह्यात ( Ahilyanagar district) गेल्या काही वर्षांत बिबट्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. ऊसशेतीत मिळणारा निवारा, पाण्याची सोय तसेच पाळीव जनावरे, कुत्रे यांसारखे सहज उपलब्ध खाद्य यामुळे बिबट्यांचा या भागातील वावर वाढला आहे. दुसरीकडे, जंगलातील नैसर्गिक खाद्याची कमतरता आणि वाढता मानवी हस्तक्षेप यामुळे बिबटे आता मानवी वस्तीकडे येऊ लागल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

पाच दिवसांत पाच बिबटे जेरबंद

बिबट्यांच्या वाढत्या उपद्रवाच्या पार्श्वभूमीवर वनविभागाने कारवाई सुरू केली आहे. मागील पाच दिवसांत श्रीरामपूर तालुक्यात पाच बिबटे जेरबंद करण्यात आले आहेत. तर राहुरी तालुक्यातील डिग्रस येथील रोपवाटिकेत सध्या तब्बल अकरा बिबट्यांना ठेवण्यात आले आहे. मात्र, तरीही ऊसतोड सुरू असलेल्या भागांमध्ये बिबट्यांचा वावर अद्याप कायम आहे.

ऊसतोड हंगामात धोका वाढण्याची शक्यता

ऊसतोडणीच्या हंगामात बिबट्यांना लपण्यासाठीचा आडोसा कमी झाल्याने त्यांचा उपद्रव अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याचा थेट फटका ऊसतोड मजूर, शेतकरी तसेच परिसरातील नागरिकांना बसत आहे. विशेषतः पहाटे आणि रात्रीच्या वेळी ऊसतोड करणाऱ्या मजुरांना मोठा धोका निर्माण झाला आहे.

वनविभागाकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी

या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांकडून वनविभागाकडे विविध मागण्या करण्यात येत आहेत. संवेदनशील भागात गस्त वाढवावी, बिबट्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवावे, नागरिक आणि ऊसतोड मजुरांमध्ये जनजागृती करावी तसेच मजुरांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे.

बिबट्यांचा वाढता वावर आणि ऊसतोडीचा हंगाम यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यात सध्या दहशतीचे वातावरण असून, वनविभाग आणि प्रशासनाने समन्वयाने ठोस पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.