Raj Thackeray | राज ठाकरेंनी पाहिला दशावतार ; गंभीर विषयावर भाष्य करणाऱ्या चित्रपटाचं कौतुक

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘दशावतार’ चित्रपट पाहून कौतुक केले. दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर यांच्या भूमिका गाजल्या असून कोकणातील जमिनींचा गंभीर प्रश्न चित्रपटातून मांडला आहे. पहिल्या 3 दिवसांत 5.22 कोटींचा गल्ला.

Sep 16, 2025 - 00:51
Sep 16, 2025 - 00:55
Raj Thackeray | राज ठाकरेंनी पाहिला दशावतार ; गंभीर विषयावर भाष्य करणाऱ्या चित्रपटाचं कौतुक
Raj Thackeray on Dashavatar Marathi Movie

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे कलाप्रेमी असून कलाकारांवर त्यांचं खास प्रेम आहे. मराठी-अस्सल किंवा हिंदी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांशी असलेली त्यांची जवळीक नेहमीच चर्चेत राहिली आहे. सध्या चर्चेत असलेला मराठी चित्रपट दशावतार (Dashavatar) राज ठाकरे यांनी खास वेळ काढून पाहिला. दिलीप प्रभावळकर यांच्या मुख्य भूमिकेत आणि सुबोध खानोलकर दिग्दर्शित हा सिनेमा कोकणातील जमिनींच्या प्रश्नावर भाष्य करतो.

चित्रपट पाहिल्यानंतर राज ठाकरे यांनी स्वतःचा अभिप्राय नोंदवत सांगितलं की, “दशावतार सिनेमातून महाराष्ट्रातील, विशेषत: कोंकणातील जमिनींचा गंभीर प्रश्न मांडला गेला आहे. मीही गेली अनेक वर्ष माझ्या भाषणांमधून हीच गोष्ट सांगत आलोय की जमीन म्हणजेच आपलं अस्तित्व आहे. त्यामुळे हा विषय अत्यंत महत्त्वाचा असून चित्रपटातून त्याला योग्य न्याय देण्यात आला आहे.”

राज ठाकरेंनी दिलीप प्रभावळकर यांच्या अभिनयाचं विशेष कौतुक केलं. प्रभावळकर हे मोठे कलाकार आहेत आणि त्यांनी उत्तम कामगिरी केली आहे. दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी विषय अत्यंत चलाखीने मांडला असून छायाचित्रण आणि संगीतही उत्तम आहे. महेश मांजरेकर, प्रियदर्शनी आणि बाकी कलाकारांनीही योग्य भूमिका साकारल्या आहेत. एकंदरीत हा चित्रपट एंटरटेनमेंटसोबत गंभीर वास्तवाला स्पर्श करणारा आहे. त्यामुळे नक्की हा चित्रपट पाहायला हवा,” असं राज ठाकरेंनी म्हटलं.

बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी

झी स्टुडिओज प्रस्तुत दशावतार प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाल्यामुळे थिएटरमध्ये गर्दी उसळली आहे. चित्रपट समीक्षक आणि सिनेसृष्टीकडूनही या सिनेमाचं कौतुक होत आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या तीन दिवसांतच दशावतारने तब्बल 5 कोटी 22 लाख रुपयांचा गल्ला जमवला असून प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी झाला आहे.