Laxman Hake : ओबीसी- मराठा वाद पेटला : लक्ष्मण हाके यांच्या वक्तव्यावर खटला..

मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर लक्ष्मण हाके यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे खळबळ; महिलांचा अपमान केल्याच्या आरोपावरून बीडमध्ये गुन्हा दाखल. समाजातून तीव्र प्रतिक्रिया.

Sep 14, 2025 - 18:02
Laxman Hake : ओबीसी- मराठा वाद पेटला : लक्ष्मण हाके यांच्या वक्तव्यावर खटला..
beed police fir against laxman hake

Laxman Hake : मराठा आरक्षणाच्या संघर्षात आणखी एक नवा वाद निर्माण झाला आहे. गेवराई तालुक्यातील शिंगारवाडी फाटा येथे झालेल्या सभेमध्ये लक्ष्मण हाके यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. “मराठा समाज आता आमच्यात (ओबीसी प्रवर्गात) आलाच आहे, तर आता आमच्यातल्या सर्वगुणसंपन्न पोरांशी तुमच्या पोरींची लग्न लावा,” असे वक्तव्य करून हाके यांनी सरळसरळ विवाह प्रस्ताव मांडला.

या वक्तव्याने मराठा समाजात संताप उसळला असून, महिलांचा अपमान केल्याचा आरोप होत आहे. गोपाळ शिंदे यांच्या तक्रारीवरून तलवाडा पोलिस ठाण्यात लक्ष्मण हाके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी हा गुन्हा अदखलपात्र स्वरूपाचा असल्याचे सांगितले असले तरी, समाजात यावरून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे सातत्याने कुणबी दाखल्याची मागणी करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर हाके यांनी हे वक्तव्य केले. मात्र, विवाह प्रस्तावाच्या रूपाने महिलांविषयी केलेले विधान हे अत्यंत आक्षेपार्ह आणि असभ्य असल्याची टीका सर्वत्र होत आहे.

महिलांच्या सन्मानाशी संबंधित प्रश्नाला ओढ देत आरक्षणासारख्या गंभीर विषयावर हलक्या पद्धतीने बोलणे हे अजिबात योग्य नसल्याचे सांगत समाजातून हाके यांच्यावर ताशेरे ओढले जात आहेत. आरक्षणाच्या चळवळीतून लक्ष विचलित करणारे आणि समाजात फूट पाडणारे असे वक्तव्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.