Beed News | बीड हादरलं! नागनाथ नन्नवरे यांचं अपहरण आणि अमानुष मारहाण

बीडमध्ये नागनाथ नन्नवरे यांचे 10 ते 12 जणांनी अपहरण करून अमानुष मारहाण केली. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतरही आरोपींना अवघ्या काही तासांत जामीन मिळाला. संतप्त कुटुंबीयांनी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला.

Sep 14, 2025 - 17:48
Sep 14, 2025 - 17:49
Beed News | बीड हादरलं! नागनाथ नन्नवरे यांचं अपहरण आणि अमानुष मारहाण
beed-abduction-nagnath-nannavare-assault-accused-bail

Beed Cime News | बीड शहरात घडलेल्या थरारक अपहरण आणि अमानुष मारहाणीच्या प्रकरणाने जिल्ह्यात मोठी खळबळ उडवली आहे. शुक्रवारी सायंकाळी चऱ्हाटा फाटा परिसरातून नागनाथ नन्नवरे यांचं 10 ते 12 जणांनी लाकडी दांड्यांनी बेदम मारहाण करत अपहरण केलं. अपहरणानंतर त्यांना धाराशिव जिल्ह्यातील भुम तालुक्यातील टोकवाडी परिसरात डांबून ठेवण्यात आलं.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर बीड ग्रामीण पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपींना डांबून ठेवलेल्या ठिकाणी धाड टाकली. यावेळी 10 आरोपींसह दोन चारचाकी वाहने पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आली. त्यांना शनिवारी सायंकाळी न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. मात्र, गंभीर गुन्हा असूनही न्यायालयाने सर्व आरोपींना अवघ्या काही तासांतच जामीन मंजूर केला. यामुळे नागरिकांत आश्चर्य व्यक्त होत असून पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

beed-abduction-nagnath-nannavare-assault-accused-bail

दरम्यान, या प्रकरणाच्या तपास आणि आरोपींना अटक करताना बीड ग्रामीण पोलिसांच्या पथकातच बाचाबाची झाल्याची माहिती पुढे आली आहे. इतकंच नाही तर एका वरिष्ठ अधिकाऱ्याने कर्मचाऱ्याला शिवीगाळ केल्याची माहितीही समोर आली आहे.

विशेष म्हणजे, नागनाथ नन्नवरे यांना झालेली अमानुष मारहाण आणि अपहरणाची घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली असून, व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

आरोपींना जामीन मिळाल्याने पीडित नागनाथ नन्नवरे आणि त्यांचे नातेवाईक आक्रोशित झाले. त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून सर्वांना ताब्यात घेतलं आणि अनर्थ टळला.

या घटनेनंतर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था आणि न्याय व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे.