Deva Bhau | मंत्रिमंडळ बैठकीत ‘देवाभाऊ’ जाहिरातीवरून खळखळून हशा
मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘देवाभाऊ’ जाहिरातीचा उल्लेख करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह सर्वांना हसवलं. मराठा आरक्षणानंतर गाजलेली ही जाहिरात पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात चर्चेत आली आहे.
मुंबई : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर गाजलेल्या ‘देवाभाऊ’ जाहिरातीचा मुद्दा आता थेट मंत्रिमंडळ बैठकीत चर्चेत आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या जाहिरातीचा उल्लेख करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वांनाच हसवलं.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आंदोलनाने राज्यभर मोठे पडसाद उमटवले होते. या आंदोलनामुळे फडणवीस यांची प्रतिमा मराठा समाजात डळमळीत झाल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात होतं. याच काळात झळकलेली ‘देवाभाऊ’ जाहिरात राजकारणात चर्चेचा विषय ठरली होती.
मंत्रिमंडळाच्या बैठकीदरम्यान अजित पवार यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या कामाचं कौतुक करताना, “चांगल्या धोरणांची प्रसिद्धी देखील तितकीच चांगली करा,” असा सल्ला दिला. त्याच वेळी पवार हसत म्हणाले, “जाहिरात कशी हवी तर ती देवाभाऊसारखी...”
या वाक्यावर मुख्यमंत्री फडणवीसांसह सर्व मंत्र्यांनी खळखळून हसत टाळ्या वाजवल्या. फडणवीस यांच्या चेहऱ्यावरदेखील स्मित उमटलं. त्यानंतर त्यांनीही हलक्याफुलक्या अंदाजात प्रतिक्रिया देत म्हटलं, “कुणी काहीही म्हणो, पण जाहिरात अशीच व्हायला हवी.”