Rahata Gender Testing | राहाता गर्भलिंग निदान रॅकेटचा मोठा भंडाफोड; 16 आरोपी निष्पन्न, IMAचे माजी अध्यक्ष डॉ. रवींद्र कुटे अटकेत
राहाता तालुक्यातील बेकायदेशीर गर्भलिंग निदान रॅकेटमध्ये मोठा खुलासा झाला असून आतापर्यंत 16 आरोपी निष्पन्न झाले आहेत. IMAचे माजी अध्यक्ष डॉ. रवींद्र कुटे यांच्यासह 12 आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून तपास पुण्यापर्यंत पोहोचला आहे.
राहाता | अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यात उघड झालेल्या बेकायदेशीर गर्भलिंग निदान आणि गर्भपात रॅकेटने (Rahata Gender Case) संपूर्ण राज्य हादरले असून या प्रकरणात तपास दिवसेंदिवस अधिक गंभीर व धक्कादायक वळण घेत आहे. आतापर्यंत या प्रकरणात तब्बल 16 आरोपी निष्पन्न झाले असून त्यापैकी 12 आरोपींना अटक करून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या रॅकेटमध्ये श्रीरामपूर येथील नामांकित डॉक्टर तसेच इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) महाराष्ट्र राज्याचे माजी अध्यक्ष डॉ. रवींद्र कुटे यांचे नाव समोर आल्यानंतर वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिस तपासात डॉ. कुटे आणि राहाता येथील एजंट प्रदीप ढगे हे संपूर्ण रॅकेटचे प्रमुख सूत्रधार असल्याची माहिती पुढे आली आहे.
14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
डॉ. रवींद्र कुटे, एजंट प्रदीप ढगे आणि इतर तिघांना राहाता न्यायालयात हजर करण्यात आले होते. सुनावणीदरम्यान पोलिसांनी या आरोपींकडून आणखी महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता व्यक्त करत तपासाची दिशा न्यायालयासमोर मांडली. त्यानंतर न्यायालयाने सर्व आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
आतापर्यंत 12 आरोपी अटकेत
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या गुन्ह्यात आतापर्यंत 12 आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये दोन डॉक्टर, चार एजंट आणि सहा गर्भवती (Illegal Gender Test) महिलांचे पती यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, श्रीरामपूर येथील डॉक्टरांवर केवळ गर्भलिंग निदानच नव्हे तर बेकायदेशीर गर्भपात केल्याचाही गंभीर आरोप आहे. तपासादरम्यान तीन महिलांचे गर्भपात या आरोपींच्या दवाखान्यात एजंटांच्या मदतीने करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे.
पुण्यापर्यंत पोहोचले रॅकेटचे धागेदोरे
या प्रकरणाचा तपास आता पुण्यापर्यंत पोहोचला आहे. पोलिस तपासात आणखी दोन आरोपी निष्पन्न झाले असून हे दोघे पुणे येथील असल्याची माहिती समोर आली आहे. नेवासा येथील डॉ. भणगे आणि एजंट प्रदीप ढगे यांनी गर्भलिंग निदानासाठी वापरले जाणारे सोनोग्राफी मशीन या पुण्यातील आरोपींकडून खरेदी केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी या दोघांनाही लवकरच ताब्यात घेण्याची तयारी सुरू केली आहे.
‘पॅकेज’ पद्धतीने चालायचा संपूर्ण व्यवहार
पोलिस तपासात या रॅकेटची कार्यपद्धती अत्यंत नियोजनबद्ध असल्याचे समोर आले आहे. एजंट आठ ते दहा गर्भवती महिलांचा गट तयार करायचे. त्यानंतर ठराविक दिवस आणि वेळ निश्चित करून महिलांना त्यांच्या पती किंवा नातेवाईकांसह बोलावले जायचे. महिला आणि त्यांचे नातेवाईक ठरलेल्या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्यांच्याकडून रोख रक्कम घेतली जायची. त्यानंतर महिलांच्या पतींना किंवा नातेवाईकांना एका ठिकाणी थांबवून एजंट त्या महिलांना चारचाकी वाहनातून दुसऱ्या गुप्त ठिकाणी घेऊन जायचे. तेथे सोनोग्राफीद्वारे गर्भाचे लिंग निदान करण्यात येत होते. तपासात डॉक्टरला प्रत्येक प्रकरणामागे सुमारे दहा हजार रुपये मिळत असल्याचे उघड झाले आहे. तर एजंटला प्रत्येकी तीन हजार रुपये मिळत होते. जर एकापेक्षा जास्त एजंट सहभागी असतील तर त्यानुसार रकमेची वाढही केली जात होती.
अनेक महिलांची ओळख पटवण्याचे काम सुरू
या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या गर्भवती महिलांची ओळख पटवण्याचे काम सध्या पोलिसांकडून सुरू आहे. काही महिलांचे जबाब नोंदवण्यात आले असून आणखी अनेक महिलांपर्यंत तपास पोहोचण्याची शक्यता आहे. तपास यंत्रणांनी सांगितले की, अनेक महिलांवर दबाव टाकून गर्भलिंग निदान करण्यात आले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.
आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्न
वैद्यकीय व्यवसायातील प्रतिष्ठित नावं या रॅकेटमध्ये समोर आल्याने आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. मुलगा हवा या मानसिकतेतून अजूनही गर्भलिंग निदान आणि बेकायदेशीर गर्भपाताचे प्रकार सुरू असल्याचे या प्रकरणातून स्पष्ट झाले आहे. राज्यात पीसीपीएनडीटी कायदा कठोर असतानाही अशा पद्धतीने संघटित रॅकेट चालत असल्याने प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, या प्रकरणातील चार आरोपी अद्याप फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे. तपास जसजसा पुढे जात आहे, तसतसे या रॅकेटमधील आणखी मोठे चेहरे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.