अकोलेतून अहिल्यानगरकडे ‘लाल वादळ’; शेतकरी–कामगारांचा लाँगमार्च सुरू
अकोले तालुक्यातील राजूर येथून अखिल भारतीय किसान सभा व CITU यांच्या वतीने शेतकरी-कामगारांचा भव्य लाँगमार्च मंगळवारी सुरू झाला. मान्य मागण्यांची अंमलबजावणी होत नसल्याच्या निषेधार्थ निघालेला हा ‘लाल वादळ’ 148 किलोमीटर पायी प्रवास करत अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देणार आहे. या लाँगमार्चमध्ये शेतकरी, आदिवासी, अंगणवाडी, आशा, शालेय पोषण आहार कर्मचारी आणि बांधकाम कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
अकोले : शेतकरी व कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी अखिल भारतीय किसान सभा आणि सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन या संघटनांच्या वतीने काढण्यात आलेल्या भव्य लाँगमार्चला (Akole long march) आज, मंगळवारी, सुरुवात झाली. अकोले तालुक्यातील राजूर येथून दुपारी तळपत्या उन्हात हे ‘लाल वादळ’ अहिल्यानगरकडे मार्गस्थ झाले. या लाँगमार्चमध्ये शेतकऱ्यांसह शालेय पोषण आहार कर्मचारी, अर्धवेळ स्त्री परिचर, अंगणवाडी सेविका, आशा कर्मचारी, बांधकाम कामगार यांच्यासह विविध क्षेत्रातील कष्टकरी व श्रमिक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
राजूरहून सुरुवात; आदिवासी प्रश्न केंद्रस्थानी
राजूर हे अकोले तालुक्यातील आदिवासी भागाचे केंद्र असून, अहिल्यानगर जिल्ह्याच्या आदिवासी विकास विभागाचे कार्यालय येथे आहे. अकोले तालुक्याचे (Farmers workers long march) विद्यमान तसेच माजी आमदारही राजूरचेच आहेत. त्यामुळे आदिवासी, शेतकरी व कामगारांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी या ठिकाणाहून लाँगमार्चला सुरुवात करण्यात आली आहे.
मान्य मागण्या, पण अंमलबजावणी नाही – किसान सभेचा आरोप
एप्रिल २०२३ मध्ये अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने अकोले ते लोणी (पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे गाव) असा लाँगमार्च काढण्यात आला होता. त्या वेळी संगमनेर येथे पालकमंत्री व अन्य मंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत (Ahilyanagar protest news) आंदोलकांच्या अनेक मागण्या मान्य करण्यात आल्या होत्या. तसेच अलीकडेच नाशिक आणि पालघर जिल्ह्यात झालेल्या लाँगमार्चदरम्यानही मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक होऊन मागण्या मान्य झाल्या होत्या. मात्र, या मान्य मागण्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नसल्याची तक्रार किसान सभेने केली आहे.
सरकारकडून दडपशाहीचा आरोप
या पार्श्वभूमीवर लाँगमार्च काढण्यात आल्याची माहिती किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले (Ajit Nawale Akole) यांनी दिली. सरकारने मागण्यांची दखल घेण्याऐवजी दडपशाहीच्या दिशेने पावले टाकण्यास सुरुवात केल्याचा आरोप त्यांनी केला. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आंदोलकांना कायदेशीर नोटीसा बजावण्यात आल्याचे सांगत, “सर्व प्रकारची कारवाई करण्याची सरकारची तयारी आहे, मात्र घामाचे दाम देण्याची तयारी नाही, ही संतापजनक बाब आहे,” असे ते म्हणाले. कोणत्याही प्रकारची दडपशाही आम्ही सहन करणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
मागण्या मान्य करा, अंमलबजावणी करा – आवाहन
सरकारने दडपशाही न करता मागण्या कशा मान्य करता येतील आणि मान्य केलेल्या मागण्यांची प्रभावी अंमलबजावणी ( Kisan Sabha long march) कशी करता येईल, यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन डॉ. नवले यांनी केले.
शिस्तबद्ध लाँगमार्च; पहिला मुक्काम अकोलेत
सदाशिव साबळे, नामदेव भांगरे, एकनाथ मेंगाळ, ताराचंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली या लाँगमार्चला सुरुवात झाली आहे. हातात लाल बावटे घेतलेले आंदोलक जोरदार घोषणा देत शिस्तबद्ध पद्धतीने मार्गक्रमण करत आहेत.या लाँगमार्चचा पहिला मुक्काम अकोले तहसील कार्यालयासमोर, तर दुसरा मुक्काम संगमनेर येथील प्रांत कार्यालय परिसरात असणार आहे. त्यानंतर हा लाँगमार्च तब्बल १४८ किलोमीटरचे अंतर पायी पार करत अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देणार आहे.