Shirdi Accident | शिर्डीत दर्शनानंतर भाविकाचा अपघाती मृत्यू; मदतीऐवजी मोबाईल चित्रीकरण करणारा समाज !

Shirdi मध्ये Sai Baba darshan करून railway station कडे पायी जात असताना एका Devotee चा private traveller bus च्या धडकेत दुर्देवी मृत्यू झाला.

Feb 21, 2026 - 20:13
Shirdi Accident | शिर्डीत दर्शनानंतर भाविकाचा अपघाती मृत्यू; मदतीऐवजी मोबाईल चित्रीकरण करणारा समाज !
शिर्डीत दर्शनानंतर भाविकाचा अपघाती मृत्यू

Shirdi Accident | शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी (Shirdi Sai baba Darshan) आलेल्या एका भाविकाचा आज अपघाती दुर्देवी अंत झाला. दर्शन करून रेल्वे स्टेशनकडे पायी जात असताना एका खाजगी ट्रॅव्हर्स बसने (private traveller bus) चिरडल्याने हा भीषण अपघात घडला. मयत भाविकाचे नाव शैलेंद्र सिंह पटेल (वय ४३) असून ते मिर्जापूर, उत्तरप्रदेश येथील रहिवासी असल्याची माहिती घटनास्थळी मिळालेल्या आधार कार्डवरून समोर आली आहे. ही घटना शिर्डी शहरातील वर्दळीच्या रस्त्यावर घडली. अपघातानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी भाविकाला साईबाबा रुग्णालय येथे दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

खड्डेमय रस्ते आणि भरधाव वाहतूक कारणीभूत?

शिर्डी हे देश-विदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. दररोज हजारो भाविक पायी दर्शनासाठी व रेल्वे स्टेशन, बसस्थानकाकडे जात असतात. मात्र शहरातील अनेक रस्ते खड्डेमय असून खाजगी लक्झरी बसेस, तसेच तीन चाकी अपे रिक्षा यांच्यातवाहतूक नियंत्रणाचा अभाव दिसून येतो. शिर्डीत वाहतूक शाखा स्वतंत्र असून दिवसभर कारवाई सुरु असते. मात्र तरीही पोलिसांची नजर चुकवत उलट दिशेने वाहतूक केली जाते. खासगी बस, ट्रॅव्हर्स आणि दुचाकी वाहनचालकांकडून वेगमर्यादा व नियमांचे सर्रास उल्लंघन होत असून पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

मदतीऐवजी मोबाईल चित्रीकरण; बघ्यांची विदारक भूमिका

या अपघातात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. रस्त्यावर एक जीव तडफडत असताना मदतीसाठी पुढे येण्याऐवजी अनेक नागरिक आणि वाटसरु मोबाईलमध्ये व्हिडिओ चित्रीकरण करत बघ्यांची भूमिका घेत असल्याचे चित्र दिसून आले. मानवी संवेदनशीलतेचा ऱ्हास होत असल्याचे हे विदारक वास्तव पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. 

अपघातानंतर चालक फरार!

शिर्डीतून बाहेरील राज्यात चालणारी न्यू पायल ट्रॅव्हर्स बस क्रमांक AR 01 W0911 ही बस नेहमी प्रमाणे शिर्डीतून नगर-मनमाड रोडवरुन कोपरगाव दिशेन जात असताना दुपारी 4:30 वाजेच्या दरम्यान निमगाव शिवारात हा अपघात झाला. यात साईबाबांचे दर्शन घेवून रेल्वे स्टेशनकडे पायी जाणारे शैलैंद्र पटेल यांना बसने पाठीमागून जोरदार धडक दिल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगीतले. तर मयत साईभक्त शैलेंद्र यांच्या जवळ साईबाबांचा लाडू प्रसाद, तीन मोबाईल, काही रोख रक्कम आणि अनेक बॅंकाचे एटीएम कार्ड पोलिसांना मिळाले. मिळालेल्या मोबाईल वरुन पोलिसांनी संपर्क करुन नातेवाईकांना घटनेची माहीती दिली आहे. तर या घटनेदरम्यान भाविकांला धडक देवून फरार होणारी लक्झरी बस काही भाविकांनी रस्त्यात पकडली यात एक चालक हाती लागला असून त्याला शिर्डी पोलिसांच्या ताब्यात दिले तर दुसरा अपघात करणारा चालक अज्ञात बुलेटवर बसून फरार झाल्याचं उपस्थितांनी सांगीतले आहे.

प्रशासन आणि समाजाला प्रश्न

या घटनेमुळे शिर्डीतील रस्त्यांची दुरवस्था, आणि नागरिकांची असंवेदनशील मानसिकता यावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी (Pilgrim safety) ठोस उपाययोजना, रस्त्यांची तातडीने दुरुस्ती, कडक वाहतूक नियंत्रण आणि जनजागृती मोहिमांची नितांत गरज असल्याची मागणी नागरिकांतून होत आहे. शिर्डी सारख्या पवित्र शहरात श्रद्धेच्या वाटेवर चालणाऱ्या भाविकांचे प्राण असे जात राहणार का, हा प्रश्न आता प्रशासन आणि समाज दोघांनाही आत्मपरीक्षण करायला भाग पाडणारा आहे.