राहाता शहरात जपानी तंत्रज्ञानातून ‘अप्पर वॉटर’ बाजारतळ; डॉ. सुजय विखे पाटील
राहाता शहरातील कातनाल्यावर जपानी तंत्रज्ञानातून ‘अप्पर वॉटर’ बाजारतळ उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला जाणार आहे. सुमारे ७ कोटी रुपयांच्या खर्चातून उभारला जाणारा हा प्रकल्प महाराष्ट्रात पहिलाच असल्याची माहिती डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली. या राहाता कातनाला बाजारतळ प्रकल्पामुळे आठवडे बाजाराची जागेची समस्या व वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.
राहाता : राहाता शहरातील आठवडे बाजाराचा दीर्घकाळ प्रलंबित असलेला प्रश्न सोडवण्यासाठी आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मोठा प्रकल्प साकारण्याची तयारी सुरू झाली आहे. जपानी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने कातनाल्यावर ‘अप्पर वॉटर’ पद्धतीने अत्याधुनिक बाजारतळ उभारण्याचा महत्त्वाकांक्षी (Rahata Katnala Market Project) उपक्रम हाती घेतला जाणार असून, यासाठी सुमारे 7 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. असा प्रयोग महाराष्ट्रात प्रथमच राबवला जाणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी दिली.
राहाता शहरात दर आठवड्याला भरत असलेल्या पारंपरिक आठवडे बाजारामुळे गेल्या अनेक वर्षांपासून विविध समस्या निर्माण होत आहेत. सध्या हा बाजार वीरभद्र मंदिरासमोरील मैदानात भरत असला तरी त्या मैदानाची क्षमता मर्यादित असल्याने बाजारासाठी जागा अपुरी पडते. परिणामी अनेक शेतकरी आणि व्यापारी आपली दुकाने नगर–मनमाड महामार्ग तसेच साकुरी रस्त्याच्या कडेला लावतात. त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होण्याबरोबरच नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागते.
याशिवाय बाजाराच्या गर्दीमुळे परिसरातील शॉपिंग कॉम्प्लेक्समधील व्यापाऱ्यांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. वाहनतळाची कमतरता, गर्दी आणि अनियोजन यामुळे बाजाराच्या दिवशी संपूर्ण परिसरात गोंधळाची परिस्थिती निर्माण होते. हा प्रश्न अनेक वर्षांपासून चर्चेत असला तरी ठोस उपाययोजना झालेली नव्हती.
या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी पुढाकार घेत राहाता नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांसोबत कातनाल्याची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी कातनाल्यात उतरून परिस्थितीचा आढावा घेतला आणि नाल्याच्या दुर्गंधीबाबतही नाराजी व्यक्त केली. या नाल्याचे अंडरग्राऊंड रूपांतर करून त्यावर आधुनिक बाजारतळ विकसित करण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला.
या प्रकल्पांतर्गत कातनाला बंदिस्त करून त्यावर मजबूत संरचना उभारण्यात येणार आहे. जपानी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने नाल्यावरील जागेचा योग्य वापर करून नियोजनबद्ध पद्धतीने बाजारतळ विकसित केला जाईल. यामध्ये शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी स्वतंत्र जागा, वाहनतळ, स्वच्छता सुविधा तसेच नागरिकांसाठी सुटसुटीत बाजार व्यवस्था उभारण्याचा विचार आहे.
प्रकल्प राबविण्याच्या दृष्टीने कातनाल्याची स्वच्छता करणे, त्याचे तांत्रिक इस्टीमेट तयार करणे तसेच नाल्यावर झालेल्या अतिक्रमणांची (encroachment) नोंद घेऊन संबंधितांना नोटिसा देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अतिक्रमण हटवून नाला पूर्णपणे मोकळा केल्यानंतरच पुढील कामाला सुरुवात केली जाणार आहे.
डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले की, राहाता शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा आणि बाजारपेठेच्या विस्ताराचा विचार करून हा प्रकल्प राबवला जात आहे. कातनाला अंडरग्राऊंड करून त्यावर आधुनिक बाजारतळ उभारल्यास वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि शेतकरी, व्यापारी तसेच नागरिकांना नियोजनबद्ध व सुरक्षित बाजारपेठ उपलब्ध होईल. हा प्रकल्प साकार झाल्यास राहाता शहराच्या नागरी सुविधांमध्ये मोठी भर पडणार असून शहराच्या विकासाला नवी दिशा मिळणार आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक, व्यापारी आणि शेतकरी यांच्याकडून या उपक्रमाबाबत सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.