शिर्डीत सुवर्ण दानाचा ओघ कायम; दोन दिवसांत साईचरणी 70 लाखांच सुवर्ण दान अर्पण..

शिर्डीत साईबाबांच्या चरणी सुवर्ण दानाचा ओघ कायम असून साईबाबा संस्थानचे माजी अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी 46 लाखांचे सहा सुवर्ण ‘ॐ’ अक्षर दान केले, तर हैदराबादच्या साईभक्त के. एस. एस. भगवान यांनी 23.59 लाखांचा सुवर्ण-हिरेजडीत हार अर्पण केला. दोन्ही देणग्यांची एकूण किंमत सुमारे 70 लाखांहून अधिक आहे.

Mar 5, 2026 - 22:50
शिर्डीत सुवर्ण दानाचा ओघ कायम;  दोन दिवसांत साईचरणी 70 लाखांच सुवर्ण दान अर्पण..
शिर्डी साईंना दोन दिवसांत साईचरणी 70 लाखांच सुवर्ण दान अर्पण.

शिर्डी : सोने-चांदीचे भाव गगनाला भिडले असले तरी शिर्डीत साईबाबांच्या चरणी सुवर्ण दानाचा ओघ थांबलेला नाही. देश-विदेशातील लाखो साईभक्त साईबाबांप्रती असलेल्या अढळ श्रद्धेतून विविध प्रकारे दान अर्पण करीत असतात. अनेक भक्त आपल्या मनोकामना पूर्ण झाल्यानंतर किंवा कृतज्ञतेच्या भावनेतून सोन्या-चांदीच्या वस्तू, दागिने, रोख रक्कम तसेच विविध मौल्यवान वस्तू श्रींच्या चरणी अर्पण करून आपली भक्ती व्यक्त करतात. नुकतेच शिर्डीत दोन साईभक्तांनी साईबाबांच्या चरणी कोट्यवधी किमतीच्या सुवर्ण दानातून श्रद्धेची प्रचिती दिली आहे.

साईबाबा संस्थानचे माजी अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी साईबाबांच्या चरणी एक अनोखी आणि आकर्षक सुवर्ण देणगी अर्पण केली आहे. डॉ. हावरे यांनी सुमारे 309 ग्रॅम वजनाची अत्यंत सुंदर नक्षीकाम असलेली सहा सुवर्ण ‘ॐ’ अक्षरे साईबाबांना अर्पण केली. या सुवर्ण दानाची एकूण किंमत 46 लाख 9 हजार 74 रुपये इतकी असल्याचे सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे ही सुवर्ण ‘ॐ’ अक्षरे विधीवत पद्धतीने साईबाबा समाधी मंदिरातील मूर्तीमागील भिंतीवर बसविण्यात आली आहेत. त्यामुळे साईबाबांच्या समाधी मंदिराच्या सजावटीतही भर पडली असून भाविकांमध्ये या अनोख्या देणगीची विशेष चर्चा आहे.

दरम्यान, तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथील साईभक्त श्री. के. एस. एस. भगवान यांनीही श्री साईबाबांच्या चरणी मौल्यवान सुवर्ण-हिरेजडीत हार अर्पण करून आपली श्रद्धा व्यक्त केली आहे. या हाराचे वजन 193.700 ग्रॅम असून त्यावर आकर्षक नक्षीकाम करण्यात आलेले आहे. तसेच त्यामध्ये हिऱ्यांची जडणघडण करण्यात आली आहे. या हाराची एकूण किंमत सुमारे 23 लाख 59 हजार 653 रुपये इतकी असल्याची माहिती संस्थानच्या वतीने देण्यात आली आहे.

साईबाबांप्रती असलेल्या भक्तिभावातून या दोन्ही साईभक्तांनी केलेल्या दानामुळे पुन्हा एकदा साईबाबांवरील भाविकांची अढळ श्रद्धा अधोरेखित झाली आहे. शिर्डीत दररोज हजारो साईभक्त दर्शनासाठी येत असतात. देशातील विविध राज्यांसह परदेशातूनही भाविक मोठ्या संख्येने शिर्डीत दाखल होतात. अनेक भक्त साईबाबांच्या कृपेने आयुष्यातील अडचणी दूर झाल्याचा अनुभव सांगतात आणि त्यानंतर कृतज्ञतेच्या भावनेतून श्रींच्या चरणी विविध प्रकारचे दान अर्पण करतात.

श्री साईबाबा संस्थानकडे दरवर्षी मोठ्या प्रमाणावर सोन्या-चांदीच्या वस्तू, दागिने आणि रोख स्वरूपातील देणग्या जमा होत असतात. या देणग्यांचा उपयोग संस्थानच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक, धार्मिक आणि सेवाभावी उपक्रमांसाठी केला जातो. आरोग्य सेवा, अन्नदान योजना, शिक्षण, धर्मशाळा आणि इतर समाजोपयोगी प्रकल्पांसाठीही या दानाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जात असल्याचे संस्थानकडून सांगण्यात येते.

दरम्यान, या भक्तीपूर्ण देणग्यांनंतर साईबाबा संस्थानच्या वतीने दोन्ही दानशूर साईभक्तांचा सत्कार करण्यात आला. साईभक्त के. एस. एस. भगवान यांचा जिल्हा व प्रधान न्यायाधीश तसेच संस्थानच्या तदर्थ समितीचे अध्यक्ष शिवाजीराव कचरे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तर डॉ. सुरेश हावरे यांचा साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

साईबाबांच्या चरणी अर्पण करण्यात आलेल्या या सुवर्ण देणग्यांमुळे भाविकांची श्रींप्रती असलेली अपार श्रद्धा आणि विश्वास पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. शिर्डीत भक्तीभावातून दिल्या जाणाऱ्या दानाचा हा प्रवाह भविष्यातही असाच कायम राहील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.