Shirdi fraud | शिर्डीत जडीबुटीच्या नावाखाली हिप्नोटाईज्ड स्कॅम; भाविकाची फसवणूक
शिर्डीत साईदर्शनासाठी आलेल्या भाविकांना हिप्नोटाईज्ड करून जडीबुटीच्या नावाखाली फसवणूक. दहा हजारांची लूट; चौघांविरोधात गुन्हा दाखल.
शिर्डी | शिर्डीत साईदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना हिप्नोटाईज्ड (संमोहीत) करून जडीबुटीच्या नावाखाली आर्थिक लूट (Shirdi fraud) करणाऱ्या भामट्यांच्या टोळीचा स्थानिक ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे पर्दाफाश झाला आहे. या प्रकरणी एका भाविकाची तब्बल दहा हजार रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. महत्वाचं म्हणजे अशा प्रकारचे दुकाने शिर्डीत अनेक वर्षांपासून दिवसाढवळ्या सुरु असून आजच शिर्डीकरांची नजर यावर कशी पडली असल्यानं आश्चर्य व्यक्त केल जात आहे.
रस्त्याच्या कडेला जडीबुटी… भाविकांवर पाळत
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिर्डी परिसरातील रस्त्याच्या कडेला काही संशयित इसम जडीबुटी सदृश औषधी वस्तू घेऊन बसलेले असतात. साईदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांवर लक्ष ठेवून हे एकटे, वृद्ध अथवा भावनिक अवस्थेतील भाविकांना हेरतात. त्यानंतर अंधश्रद्धा, चमत्कार आणि आजार बरे होण्याचे दावे करत भाविकांना बोलण्यात गुंतवले जाते.
संमोहनासारख्या प्रकारातून फसवणूक
संशयितांकडून भाविकांना हिप्नोटाईज्ड केल्यासारखी अवस्था निर्माण केली (Hypnotised scam in Shirdi) जात असल्याचे समोर आले आहे. या अवस्थेत भाविकांच्या निर्णयक्षमतेवर परिणाम होत असून, त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात रक्कम उकळली जात असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
“टक्कल जाईल, केस येतील”; आमिषाने विश्वासात घेतले
या टोळीने एका भाविकाला जडीबुटीच्या माध्यमातून डोक्यावरील टक्कल जाईल, केस पुन्हा उगवतील, नशीब बदलेल आणि घरातील अडचणी दूर होतील, असे सांगत विश्वासात घेतले. त्यानंतर वेगवेगळ्या बहाण्याने त्याच्याकडून रोख रक्कम उकळत १० हजार रुपयांची जडीबुटी पावडरची पुडी (Fake ayurvedic scam Shirdi) देण्यात आली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संबंधित भाविकाने शिर्डी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली.
ग्रामस्थांची सतर्कता; चौघांविरोधात गुन्हा दाखल
दरम्यान, परिक्रमेसाठी आलेल्या पन्नासवर्षीय गिरीकुमार या भाविकाची फसवणूक झाल्याचे शिर्डीकरांच्या लक्षात येताच त्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत साईकृपा आयुर्वेदिक येथील मनोज गोविंद शिर्के, मोना मनोज शिर्के, राणी पखाले आणि रज्जो सडमोके अशा चौघांविरोधात गुन्हा दाखल प्रक्रीया सुरु केली आहे. तसेच संबधित घटनेचा पुढील तपास सुरू असून, आणखी फसवणूक झालेल्या भाविकांचा शोध घेतला जात आहे.
भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
या घटनेमुळे शिर्डीत येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दररोज लाखो भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येतात. अशा परिस्थितीत बनावट जडीबुटी, चमत्कार आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली सक्रिय असलेल्या टोळ्या ही गंभीर बाब मानली जात आहे.
पोलिसांचे आवाहन
शिर्डी पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेत तपास सुरू केला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. भाविकांनी कोणत्याही अंधश्रद्धा, चमत्कार किंवा जडीबुटीच्या आमिषाला बळी न पडता सतर्क राहावे. तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.