इराण-इज्रायल युद्धावर रामदास आठवले यांची शिर्डीत मोठी प्रतिक्रिया

युद्ध लवकर थांबले नाही तर इंधनपुरवठ्यावर परिणाम होऊन वाहतूक व्यवस्थेवरही परिणाम होऊ शकतो, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली.

Mar 8, 2026 - 13:14
इराण-इज्रायल युद्धावर रामदास आठवले यांची शिर्डीत मोठी प्रतिक्रिया

Ramdas Aathwale | इराण-इज्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताच्या इंधन साठ्याबाबत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी महत्त्वपूर्ण विधान केलंय. युद्ध दीर्घकाळ सुरू राहिल्यास देशातील इंधनपुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली. दरम्यान ते आज अहिल्यानगर दौऱ्यावर असताना शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी आले होते. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी इराण-इज्रायल-अमेरिका तणाव, तसेच राज्यातील राजकीय घडामोडींवरही भाष्य केलं.

इराण आणि इज्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक स्तरावर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर भारताकडे साधारण दोन महिन्यांचा इंधन साठा उपलब्ध असल्याची माहिती केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिली. युद्ध लवकर थांबले नाही तर इंधनपुरवठ्यावर परिणाम होऊन वाहतूक व्यवस्थेवरही परिणाम होऊ शकतो, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका स्पष्ट असून आम्हाला युद्ध नको तर बुद्ध हवा, म्हणजेच जगात शांतता प्रस्थापित व्हावी अशी भारताची भूमिका असल्याचंही आठवले म्हणाले.

दरम्यान राज्यातील राजकीय घडामोडींवर बोलताना अजित पवार यांचा कोणत्याही पक्षात शत्रू नसल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांच्या संदर्भातील प्रकरणात घातपात झाला असावा असं वाटत नसल्याचं सांगत, नेमकी चूक कोणाची आहे याची चौकशी होणं आवश्यक असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

तसेच प्रफुल पटेल यांच्या व्हीआरएस कंपनीच्या मालकाच्या मुलाच्या लग्नातील फोटोवरून सुरू असलेल्या ट्रोलिंगबाबत बोलताना, ते नागरी उड्डयन मंत्री असताना कार्यक्रमाला गेले असतील, त्यावेळी पुढे काय होईल हे कोणाला माहिती असतं, असं म्हणत त्यांनी प्रफुल पटेल यांची पाठराखण केली.

“इराण-इज्रायल युद्धामुळे जगात तणाव वाढलाय. भारताकडे साधारण दोन महिन्यांचा इंधन साठा आहे. युद्ध लवकर थांबायला हवं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका स्पष्ट आहे – आम्हाला युद्ध नको, बुद्ध हवा… जगात शांतता प्रस्थापित व्हावी ही भारताची भूमिका आहे.”