Ahilyanagar News | ऐतिहासिक निर्णय : अहमदनगर रेल्वेस्थानकाचे झाले ‘अहिल्यानगर’
महाराष्ट्र सरकारने अहमदनगर रेल्वेस्थानकाचे नामांतर अधिकृतपणे पूर्ण केले आहे. केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर ११ सप्टेंबर २०२५ रोजी गॅझेट अधिसूचना जाहीर करण्यात आली. त्यामुळे आता देशभरात रेल्वेकडून या स्थानकाचा उल्लेख ‘अहिल्यानगर’ या नावानेच केला जाणार आहे. गेल्यावर्षी जिल्हा, तालुका आणि शहराचे नामांतर झाल्यानंतर आता रेल्वेस्थानकाचे नामांतरही पूर्ण झाले आहे.
Ahilyanagar News | अहमदनगर जिल्ह्याच्या नावबदल प्रक्रियेनंतर आता रेल्वेस्थानकाच्या नामांतरालाही अंतिम मुहूर्त मिळाला आहे. महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयाकडून ना हरकत मिळाल्यानंतर अहमदनगर रेल्वेस्थानकाचे नामांतर पूर्ण झाले असून, आता यापुढे ‘अहिल्यानगर रेल्वेस्थानक’ म्हणूनच ओळखले जाणार आहे.
ahmednagar-railway-station-renamed-ahilyanagar
गेल्या वर्षीच अहमदनगर शहर, तालुका आणि जिल्ह्याचे नाव बदलून अहिल्यानगर करण्यात आले होते. राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या सर्व शासकीय कार्यालयांची नावे बदलण्याची प्रक्रिया तेव्हाच पूर्ण झाली होती. मात्र, रेल्वे स्थानकाचे नामांतर हा केंद्र सरकारच्या अखत्यारीतला विषय असल्यामुळे या निर्णयाला वेळ लागला.
राज्य सरकारने यासंदर्भात प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला होता. अखेर, केंद्रीय गृहमंत्रालयाने २ सप्टेंबर २०२५ रोजी या प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यानुसार, महाराष्ट्र सरकारने ११ सप्टेंबर रोजी राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध केली. या अधिसूचनेनंतर रेल्वेच्या सर्व अधिकृत कागदपत्रांमध्ये, तिकिटांमध्ये, तसेच देशभरातील रेल्वे नेटवर्कमध्ये अहमदनगर ऐवजी अहिल्यानगर हेच नाव वापरले जाणार आहे.
अहमदनगरचे नामांतर करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत होती. अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मरणार्थ ‘अहिल्यानगर’ हे नाव देण्यात आले. जिल्ह्याच्या नामांतरानंतर आता रेल्वेस्थानकाचे नामांतर झाल्याने स्थानिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
या निर्णयानंतर अहमदनगर या ऐतिहासिक नावाला पूर्णविराम मिळाला असून, प्रशासनापासून प्रवाशांपर्यंत सर्व स्तरावर आता ‘अहिल्यानगर’ हेच नाव रूढ होणार आहे. रेल्वेच्या सर्व संकेतस्थळांवर, प्रवासी माहिती फलकांवर, तिकिटांवर आणि गाड्यांच्या वेळापत्रकांमध्ये पुढील काही दिवसांत हे नाव दिसू लागेल.