Ahilyanagar News | राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेत अकोलेची कन्या फिजा सय्यद हिटे सुवर्णयश
४७ व्या वरिष्ठ राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेत अकोले तालुक्याची कन्या आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू फिजा सय्यद हिने उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले आहे. तिच्या या यशामुळे अकोले तालुक्यासह संपूर्ण नगर जिल्ह्याचा नावलौकिक वाढला आहे.
अकोले | ४७ व्या वरिष्ठ राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेत अकोले तालुक्याची कन्या आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू फिजा सय्यद हिने उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले आहे. तिच्या या यशामुळे अकोले तालुक्यासह संपूर्ण नगर जिल्ह्याचा नावलौकिक वाढला आहे.
१४ ते १८ डिसेंबर २०२५ या कालावधीत पश्चिम बंगालमधील दत्तापुलिया येथे ही वरिष्ठ राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे आयोजन सॉफ्टबॉल असोसिएशन ऑफ इंडिया आणि पश्चिम बंगाल सॉफ्टबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. या स्पर्धेत देशभरातील अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे पुरुष आणि महिला खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
या चुरशीच्या स्पर्धेत फिजा सय्यद हिने आपल्या दमदार खेळाच्या जोरावर संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. तिच्या खेळात ताकद, कौशल्य आणि सांघिक समन्वयाचा उत्तम नमुना पाहायला मिळाला.
फिजा सय्यद ही अहिल्यानगर (नगर) जिल्ह्यातील दुर्गम, डोंगराळ व आदिवासी भागातील कन्या असून तिने आपल्या कष्ट, जिद्द आणि सातत्याच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवले आहे. तिने आजपर्यंत अनेक आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.
सन २०१३ पासून सॉफ्टबॉल खेळात सक्रिय असलेल्या फिजा हिने तालुकास्तरापासून ते आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत विविध स्पर्धांमध्ये सातत्याने सहभाग घेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
सन २०१७ मध्ये २४ वी सीनियर महाराष्ट्र सॉफ्टबॉल चॅम्पियनशिप (मुंबई) मध्ये तिच्या संघाने उपविजेतेपद पटकावले.
सन २०१८ मध्ये २४ वी ज्युनिअर नॅशनल महाराष्ट्र सॉफ्टबॉल चॅम्पियनशिप (औरंगाबाद) मध्ये तिने कास्यपदक मिळवले.
तसेच २०१८-१९ मध्ये ३६ वी ज्युनिअर नॅशनल सॉफ्टबॉल चॅम्पियनशिप (चित्तूर, आंध्र प्रदेश) मध्ये महाराष्ट्र संघाला सुवर्णपदक मिळवून देण्यात तिचा मोठा वाटा होता.
सन २०१८ मध्ये भारतीय अंडर-१९ संघाकडून सातव्या एशियन ज्युनिअर महिला सॉफ्टबॉल चॅम्पियनशिप (क्लार्क, फिलिपिन्स) मध्ये तिने उत्कृष्ट कामगिरी केली.
याशिवाय १४ ते १७ डिसेंबर २०२२ दरम्यान एशियन वुमन युनिव्हर्सिटी सॉफ्टबॉल चॅम्पियनशिप (पटाया, थायलंड) येथेही तिने भारतीय संघाकडून उल्लेखनीय खेळ सादर केला.
आजपर्यंत फिजा सय्यद हिला क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय तसेच राष्ट्रीय, राज्य व जिल्हास्तरीय अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. यावर्षीचा जिल्हा क्रीडा पुरस्कार तिला पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे.
फिजा सय्यद हिच्या या यशामुळे ग्रामीण व आदिवासी भागातील तरुणींना नवी प्रेरणा मिळाली असून तिच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.