Sangamner | साई बालाजी पेट्रोल पंपावर पेट्रोलऐवजी पाणी; शेकडो दुचाकी वाहने बंद
संगमनेर तालुक्यातील कसारे येथे असलेल्या एचपी कंपनीच्या साई बालाजी पेट्रोल पंपावर पेट्रोलमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असल्याचा (HP petrol pump water in petrol) धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
संगमनेर : संगमनेर तालुक्यातील कसारे येथे असलेल्या एचपी कंपनीच्या साई बालाजी पेट्रोल पंपावर पेट्रोलमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असल्याचा (HP petrol pump water in petrol) धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या पेट्रोल पंपावरून इंधन भरल्यानंतर अनेक दुचाकी वाहने अचानक बंद पडू लागल्याने वाहनचालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सकाळपासून शेकडो दुचाकी वाहनांमध्ये हे इंधन भरले गेल्याने अनेकांना मोठा आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. तर ग्राहकांनी संतप्त होत रास्ता रोको करत नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
50 टक्के पेट्रोल, 50 टक्के पाणी?
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, पेट्रोल पंपावरून इंधन भरल्यानंतर काही अंतरावरच अनेक दुचाकी वाहने बंद पडू लागली. सुरुवातीला वाहनांमध्ये तांत्रिक बिघाड झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र वाहनांची तपासणी केली असता पेट्रोल टाकीत मोठ्या प्रमाणात पाणी मिसळलेले असल्याचे स्पष्ट झाले.
काही वाहनचालकांनी पेट्रोल टाकीतून इंधन बाहेर काढून बाटली आणि बादलीमध्ये तपासले असता त्यात जवळपास 50 टक्के पाणी आणि 50 टक्के पेट्रोल असल्याचे दिसून आले. त्यामुळे संतप्त ग्राहकांनी पेट्रोल पंपावर गर्दी करत निषेध व्यक्त केला.
वाहनचालकांना वाहन उलट करावी लागली
या घटनेमुळे अनेक वाहनचालकांना अक्षरशः आपली दुचाकी उलटी करून टाकीत साचलेले पाणी बाहेर काढावे लागले. काही वाहनांना मेकॅनिककडे नेऊन टाकी पूर्णपणे साफ करावी लागली. त्यामुळे ग्राहकांना अतिरिक्त खर्चही सहन करावा लागला.
टाकीत गळती की गंभीर निष्काळजीपणा?
प्राथमिक माहितीनुसार, पेट्रोल पंपाच्या भूमिगत साठवण टाक्यांची योग्य देखभाल न केल्यामुळे त्यामध्ये पाणी शिरले असावे असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र नागरिकांच्या (Ahilyanagar petrol pump controversy) मते हा प्रकार केवळ तांत्रिक बिघाड नसून गंभीर निष्काळजीपणा किंवा भेसळ असल्याची शक्यता नाकारता येत नाही. नेमक पेट्रोल पंपाच्या भुमिगत साठवण टाकीत पाणी कसे गेले याबाबत पंप संचालकांना संपर्क केला मात्र कोणतीही अधिकृत माहीती देण्यात आली नाही.
इंजिनला होऊ शकते मोठे नुकसान
तज्ज्ञांच्या मते पेट्रोलमध्ये पाणी मिसळल्यास वाहनाच्या इंजिनवर गंभीर परिणाम होऊ शकतो. इंजिन जाम होणे, इंजेक्टर खराब होणे, फ्युएल पंप निकामी होणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे वाहनचालकांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता असते.
ग्राहकांची कारवाईची मागणी
या प्रकारामुळे संतप्त झालेल्या ग्राहकांनी संबंधित पेट्रोल पंपावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. तसेच ज्या वाहनचालकांचे नुकसान झाले आहे त्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशीही मागणी करण्यात येत आहे.
नागरिकांनी घ्यावयाची काळजी
तज्ज्ञांच्या मते वाहनचालकांनी इंधन भरताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.
-
शक्यतो विश्वासार्ह पेट्रोल पंपावरूनच इंधन भरावे.
-
वाहन अचानक बंद पडल्यास टाकीतील इंधन तपासून पाहावे.
-
संशयास्पद प्रकार दिसल्यास त्वरित अन्न व नागरी पुरवठा विभाग किंवा स्थानिक प्रशासनाकडे तक्रार करावी.
प्रशासनाची भूमिका महत्त्वाची
या घटनेनंतर आता प्रशासन आणि संबंधित तेल कंपनीने या प्रकरणाची सखोल (petrol pump fraud Maharashtra) चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणे गरजेचे असल्याची मागणी जोर धरत आहे. अन्यथा अशा प्रकारांमुळे सर्वसामान्य वाहनचालकांचा विश्वास डळमळीत होण्याची शक्यता आहे.