Shirdi News | शिर्डीत नववर्ष स्वागतासाठी अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था; साईमंदिर 31डिसेंबरला रात्रभर खुले
नववर्ष 2026 च्या स्वागतासाठी शिर्डी प्रशासनाने कडेकोट सुरक्षा व्यवस्था उभारली आहे. वर्षअखेरीस साईबाबांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी होत असल्याने मुख्य रस्ता ‘नो व्हेईकल झोन’ करण्यात आला आहे. सुमारे साडेचारशे पोलीस, बीडीडीएस, क्यूआरटी आणि रॅपिड रिस्पॉन्स फोर्स तैनात आहेत. ३१ डिसेंबर रोजी साईमंदिर रात्रभर खुले राहणार असून मंदिरापासून एक किलोमीटर अंतरावर वाहनतळांची व्यवस्था करण्यात आली आहे.
शिर्डी | सरत्या 2025 वर्षाला निरोप देत आणि येणाऱ्या 2026 नववर्षाच्या स्वागतासाठी साईनगरी (Shirdi New Year 2026) शिर्डी सज्ज झाली आहे. वर्षाच्या अखेरीस साईबाबांच्या दर्शनासाठी देश-विदेशातून लाखो भाविक शिर्डीकडे येतात. यंदाही डिसेंबरच्या अखेरीस शिर्डीत भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शिर्डी प्रशासन, साईबाबा संस्थान आणि पोलिस प्रशासनाने संयुक्तपणे व्यापक नियोजन केलं आहे.
भाविकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत शिर्डीतील मुख्य रस्ता आणि मंदिर परिसर ‘नो व्हेईकल झोन’ घोषित करण्यात आला आहे. मंदिर परिसरात अनावश्यक वाहनांची गर्दी होऊ नये, वाहतूक कोंडी टाळावी तसेच भाविकांना सुरक्षित व सुलभ दर्शन मिळावं, यासाठी ही उपाययोजना करण्यात आली आहे. पर्यायी मार्गांवर वाहतूक वळवण्यात आली असून त्यासाठी ठिकठिकाणी दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत.
नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर सुमारे साडेचारशे पोलीस अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. यामध्ये स्थानिक पोलीस दलासह बीडीडीएस (बॉम्ब शोध व नाशक पथक), क्यूआरटी (क्विक रिस्पॉन्स टीम) आणि रॅपिड रिस्पॉन्स फोर्सची विशेष पथकं समाविष्ट आहेत. गर्दीच्या संवेदनशील ठिकाणी सतत गस्त घालण्यात येत असून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या (Sai Baba Darshan New Year) माध्यमातून नियंत्रण कक्षातून नजर ठेवण्यात येत आहे.
साईमंदिर रात्रभर खुले
31 डिसेंबर रोजी नववर्षाच्या स्वागतासाठी साईमंदिर (Sai Mandir Open 31 December) रात्रभर खुले राहणार आहे. त्यामुळे मध्यरात्री मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी उपस्थित राहण्याची शक्यता असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस यंत्रणा पूर्णतः सज्ज ठेवण्यात आली आहे. संशयास्पद व्यक्ती, वस्तू किंवा हालचालींवर कडक नजर ठेवली जात आहे.
पोलिसांच आवाहन
भाविकांची दर्शन रांग मंदिर परिसराच्या बाहेरपर्यंत वाढत (New Year Crowd Shirdi) असल्याने वाहतूक व्यवस्थापनाचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला आहे. मंदिरापासून किमान एक किलोमीटर अंतरावर मोठे वाहनतळ उभारण्यात आले असून खासगी व सार्वजनिक वाहनांसाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. याबाबत माहिती देताना पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांनी सांगितले की, भाविकांनी आपली वाहने ठरवून दिलेल्या वाहनतळांमध्येच उभी करावीत आणि नियमांचे पालन करावं.
दरम्यान, भाविकांना अडचण येऊ नये यासाठी स्वयंसेवक, साईबाबा संस्थानचे कर्मचारी तसेच पोलिस कर्मचारी मार्गदर्शनासाठी तैनात करण्यात आले आहेत. गर्दीच्या काळात संयम बाळगावा, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि प्रशासनाला सहकार्य करावं, असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी सजलेली शिर्डी, भक्तीभाव आणि शिस्तबद्ध नियोजनाच्या माध्यमातून भाविकांना सुरक्षित आणि सुखकर दर्शन देण्यासाठी सज्ज असल्याचं चित्र सध्या साईनगरीत पाहायला मिळत आहे.
Shirdi New Year Celebrations Rule | शिर्डी साईमंदिर थर्टीफर्स्टसाठी सज्ज | Shirdi Police | @NagarPolice @SSSTShirdi pic.twitter.com/u8bLuHzgw6 — SP24 TAAS (@Sp24N) December 28, 2025