Sushma Andhare | तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत; सुषमा अंधारे यांची मोठी गुगली | Devendra Fadnavis |

राज्यातील ड्रग्ज प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकांवर प्रश्न उपस्थित होत आहेत. सामाजिक कार्यकर्त्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्र्यांनी न्यायाधीशाची भूमिका घेऊ नये, अशी टीका केली आहे. या प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सख्खे बंधू प्रकाश शिंदे यांचे नाव समोर आल्याने निष्पक्ष तपासासाठी एकनाथ शिंदे यांनी पदापासून बाजूला राहावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच विशाल मोरे हा ड्रग्ज प्रकरणाचा सूत्रधार नसून तो केवळ पेडलर किंवा मोहरा असू शकतो, असा दावा करण्यात आला आहे. संपूर्ण प्रकरणात राजकीय हस्तक्षेप टाळून पारदर्शक तपास व्हावा, अशी मागणी जोर धरत आहे.

Dec 19, 2025 - 19:05
Sushma Andhare | तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत; सुषमा अंधारे यांची मोठी गुगली | Devendra Fadnavis |
Sushma Andhare : साताऱ्यात पोलिसांनी धाड टाकून ड्रग्जचा मोठा साठा जप्त केला होता. या प्रकरणात उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. ड्रग्ज सापडलेली जागा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे बंधू प्रकाश शिंदे (Prakash Shinde) यांच्या मालकीची असल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केला होता. यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. 
आता या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदेना क्लिनचिट दिली देत शिंदेच नाव आणण्याचा प्रयत्न चुकीचा आणि अयोग्य असल्याचं म्हटलं होत, सेच आतापर्यंत समोर आलेल्या पुराव्यात एकनाथ शिंदे यांच्या परिवाराचा संबंध दुरावन्याने आढळून आलेला नाही. आम्ही याप्रकरणाची पूर्ण चौकशी करत असल्याचं देखिल मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केल्यानंतर सुषमा अंधारे यांनी कोपरगाव सभेसाठी जाण्याआधीच तडकाफडकी पत्रकार परिषद घेत फडणवीसांचा समाचार घेतला आहे.

"मुख्यमंत्री न्यायाधीशाची भूमिका बजावू नयेत" – अंधारे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याचे पालक असल्याचे नमूद करत, त्यांनी कोणत्याही प्रकरणात न्यायाधीशाची भूमिका बजावू नये, असे सुषमा अंधारे यांनी (Sushma Andhare Statement) स्पष्ट केले. "मुख्यमंत्र्यांच्या दालनाबाहेर ‘येथे क्लिनचिट मिळेल’ असा फलक लावावा, अशी परिस्थिती निर्माण होता कामा नये," असा टोला त्यांनी लगावला.

एकनाथ शिंदेंवर थेट आरोप नाही, पण तपासावर प्रश्नचिन्ह

"मी कधीही एकनाथ शिंदे गुन्हेगार आहेत, असे म्हटलेले नाही," असे स्पष्ट करत अंधारे म्हणाल्या की ड्रग्ज प्रकरणाच्या एकूण घटनाक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सख्खे बंधू प्रकाश शिंदे यांचे नाव समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणातील तपासावर कोणताही राजकीय प्रभाव पडू नये, यासाठी एकनाथ शिंदे यांनी पदापासून बाजूला राहावे, अशी मागणी त्यांनी केली.

मागील उदाहरणांचा दाखला

बीड प्रकरणात वाल्मिक कराड याला राजकीय फायदा होऊ नये, यासाठी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यात आला होता. तसेच पार्थ पवारांच्या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती. याच धर्तीवर, प्रकाश शिंदे यांच्या प्रकरणात निष्पक्ष तपासासाठी एकनाथ शिंदे यांचा राजीनामा आवश्यक असल्याचे अंधारे यांनी सांगितले.

"तपास पूर्ण झाल्यावर शिंदे मुख्यमंत्री व्हावेत" – अंधारे

एकनाथ शिंदे यांनी सध्या बाजूला राहावे आणि एकदा तपास पूर्ण झाल्यानंतर प्रकाश शिंदे निर्दोष ठरले, तर एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री न राहता मुख्यमंत्री व्हावे, असेही त्या म्हणाल्या. यावेळी त्यांनी उपरोधिक शैलीत, "तेव्हा सुषमा अंधारे पुष्पगुच्छ घेऊन येतील," असे विधान केले.

विशाल मोरे – सूत्रधार की मोहरा?

या प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून नाव समोर आलेल्या विशाल मोरेबाबतही सुषमा अंधारे यांनी सावध भूमिका घेतली. "विशाल मोरे हा ड्रग्ज प्रकरणाचा सूत्रधार आहे, असे म्हणण्याची घाई करू नये. तो ड्रगचा पेडलर असू शकतो, मात्र तो फक्त एक मोहरा असण्याची शक्यता नाकारता येत नाही," असे त्यांनी सांगितले.

ठाणे परिसरातील धाडसत्रांकडे लक्ष वेधले

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकदा गुगल मॅपवर नजर टाकावी, असा सल्ला देत अंधारे म्हणाल्या की ड्रग्जविरोधी कारवाया प्रामुख्याने ठाणे परिसरात झालेल्या दिसतात. ड्रग्ज प्रकरणातील विविध धागेदोरे फिरून पुन्हा एकनाथ शिंदे यांच्याशी संबंधित व्यक्तींकडे जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

निष्पक्ष तपासाची मागणी

एकूणच, या ड्रग्ज प्रकरणात कोणालाही आधीच दोषी ठरवू नये, मात्र तपासावर राजकीय दबाव येऊ नये, हीच भूमिका सुषमा अंधारे यांनी घेतली आहे. येत्या काळात तपास यंत्रणा या प्रकरणात कोणते निष्कर्ष काढतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.