छत्रपती संभाजीनगर : मुक्ती दिनाच्या कार्यक्रमात ओबीसी आंदोलकांचा गोंधळ
छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाडा मुक्ती दिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणादरम्यान ओबीसी आंदोलकांनी काळे कापड फडकावून घोषणाबाजी केली. पोलिसांनी तीन आंदोलकांना ताब्यात घेतले असून सुरक्षा त्रुटींवर चौकशी सुरू आहे.
छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्ती दिनाच्या औचित्याने सिद्धार्थ उद्यानात आयोजित कार्यक्रमात ध्वजारोहणानंतर अनपेक्षित गोंधळ उडाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) भाषण सुरू करताच काही ओबीसी आंदोलकांनी (OBC Andolan) काळे कापड फडकावत सरकारविरोधात घोषणाबाजी केली.
सरकार ओबीसी समाजावर अन्याय करत असल्याचा आरोप करत आंदोलकांनी निषेध व्यक्त केला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत तीन आंदोलकांना ताब्यात घेतले.
दरवर्षीप्रमाणे यंदाही सकाळी 9 वाजता ध्वजारोहण सोहळा झाला. पोलिस दलाने हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली आणि बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना दिली. त्यानंतर मुख्यमंत्री भाषणाला सुरुवात करताच दोन आंदोलक उभे राहून घोषणा करू लागले, तर आणखी एकाने पाठिमागून घोषणाबाजी केली.
आंदोलकांची मागणी होती की, मराठा समाजाला कुणबी (Maratha Aarkshan) प्रमाणपत्र देण्यासाठी राज्य सरकारने लागू केलेल्या हैदराबाद गॅझेटिअरचा शासन निर्णय रद्द करावा.
या घटनेनंतर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,
“मराठवाडा मुक्ती दिनासारख्या प्रसंगी अशा प्रकारचे आंदोलन होणे दु:खद आहे. काही जण केवळ प्रसिद्धीसाठी अशा घोषणा देतात. यापेक्षा मला काही बोलायचे नाही.”
दरम्यान, पोलिस उपायुक्त पंकज अतुलकर यांनी सांगितले की, आंदोलकांना तातडीने ताब्यात घेण्यात आले असून, सुरक्षा त्रुटींवर चौकशी करून कारवाई केली जाईल. सिद्धार्थ उद्यानात प्रवेश करणाऱ्यांची काटेकोर तपासणी करण्यात येत होती, मात्र आंदोलक आत कसे शिरले याचा तपास सुरू आहे.