सदनिका घोटाळा प्रकरणात माणिकराव कोकाटेंचा राजीनामा, क्रीडा खाते काढले; अटक होण्याची शक्यता
सदनिका घोटाळा प्रकरणात अडचणीत आलेले मंत्री माणिकराव कोकाटे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला असून त्यांचे क्रीडा खाते काढून घेण्यात आले आहे. न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवल्यानंतर त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी झाले असून, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. रिक्त झालेल्या क्रीडा खात्याची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तात्पुरती स्वीकारली आहे.
मुंबई: राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. सदनिका घोटाळा प्रकरणात अडचणीत आलेल्या माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate resignation) यांचे क्रीडा खाते काढून घेण्यात आले असून, त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे दिला आहे. कोकाटे यांच्या राजीनाम्याचा प्रस्ताव सध्या राज्यपालांकडे असून, अंतिम निर्णयाची औपचारिक प्रक्रिया पूर्ण होणे बाकी आहे.
बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिकेचा लाभ घेतल्याप्रकरणी माणिकराव कोकाटे यांना कनिष्ठ न्यायालयाने दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली होती. ही शिक्षा सत्र न्यायालयानेही कायम ठेवली. त्यानंतर कोकाटे (Maharashtra minister resignation) यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले असून, कोणत्याही क्षणी त्यांची अटक होण्याची शक्यता आहे. सध्या कोकाटे मुंबईतील एका रुग्णालयात दाखल असून, त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती आहे.
अटक वॉरंट जारी झाल्यानंतर कोकाटे नेमका केव्हा राजीनामा देणार, यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होत्या. सुरुवातीला त्यांनी राजीनामा दिल्याचे सांगण्यात आले होते, मात्र नंतर त्यांनी कोणताही राजीनामा दिला नसल्याच्या चर्चांनी संभ्रम निर्माण झाला. आता मात्र माणिकराव कोकाटे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचे स्पष्ट झाले आहे. सदनिका घोटाळा प्रकरणात न्यायालयाकडून कोणताही दिलासा न मिळाल्याने हे प्रकरण कोकाटे यांना चांगलेच अंगलट आले आहे.
दरम्यान, कोकाटे यांचे खाते काढून घेण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांकडे शिफारस केली होती, ती राज्यपालांनी मान्य केली. त्यामुळे कोकाटे आता अधिकृतपणे मंत्रिपदावरून पायउतार झाले आहेत. त्यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या क्रीडा खात्याची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तात्पुरत्या स्वरूपात स्वीकारली आहे.
कोकाटे यांच्याविरोधात कारवाई करताना केवळ खाते काढून घेणे पुरेसे नाही, तर मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी विरोधकांकडून सातत्याने होत होती. काही दिवसांपूर्वीही कोकाटे यांचे मंत्रिपद धोक्यात आले होते. त्यावेळी खाते बदल करून त्यांचे मंत्रिपद वाचवण्यात आले होते. मात्र, आता अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कठोर भूमिका घेत कारवाई केली आहे.
दरम्यान, कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट असल्याने कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता कायम असून, राज्याच्या राजकारणात पुढील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.