Pathardi Cloudburst | पाथर्डी तालुक्यात ढगफुटी सदृश्य पावसाने हाहाकार, जनजीवन विस्कळीत

अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात सोमवारी मध्यरात्रीनंतर झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे संपूर्ण तालुक्यात जनजीवन विस्कळीत झाले. विशेषतः तालुक्याच्या पश्चिम भागात तब्बल काही तास मुसळधार पाऊस कोसळत राहिल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला, घरात पाणी शिरले, जनावरे व वाहने वाहून गेल्याच्या धक्कादायक घटना समोर आल्या.

Sep 15, 2025 - 21:00
Sep 15, 2025 - 21:03
Pathardi Cloudburst | पाथर्डी तालुक्यात ढगफुटी सदृश्य पावसाने हाहाकार, जनजीवन विस्कळीत
pathardi cloudburst heavy rain ahilyanagar

अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात सोमवारी मध्यरात्रीनंतर झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे संपूर्ण तालुक्यात जनजीवन विस्कळीत झाले. विशेषतः तालुक्याच्या पश्चिम भागात तब्बल काही तास मुसळधार पाऊस कोसळत राहिल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला, घरात पाणी शिरले, जनावरे व वाहने वाहून गेल्याच्या धक्कादायक घटना समोर आल्या.

वाहतुकीचा ठप्प कारभार

रात्री तीनच्या सुमारास पावसाने अचानक जोर धरला. परिणामी –

  • कल्याण–विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्ग

  • बारामती–छत्रपती संभाजीनगर राज्य महामार्ग

  • पाथर्डी–बीड मार्ग

या प्रमुख मार्गावरील पुलांवरून पाणी वाहत असल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. सकाळनंतर काही ठिकाणी वाहतूक हळूहळू सुरू करण्यात आली.

गावांचा संपर्क तुटला, नागरिकांचे हाल

  • करंजी, मढी यांसह डझनभर गावांचा संपर्क तुटला.

  • काही घरांमध्ये पाणी शिरल्याने गावकरी झाडांवर, उंच ठिकाणी आश्रयाला गेले.

  • करंजी गावात पुरात अडकलेल्या १६ नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.

  • नदीपात्र आकुंचन झाल्याने पाण्याचा प्रवाह थेट गावात शिरला व नदीकाठच्या वस्त्यांना मोठा फटका बसला.

  • कसबा विभागातील खोलेश्वर, तपनेश्वर, मी मंदिर, आमराई मंदिर परिसर पाण्याखाली गेला.

शेतजमिनी व पिकांचे प्रचंड नुकसान

सलग तीन दिवसांच्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे –

  • बाजरी, कापूस, तूर, मूग ही पिके वाहून गेली.

  • फळबागा उद्ध्वस्त झाल्या.

  • कांदा पिकांचे आणि साठवलेल्या कांद्याचेही मोठे नुकसान झाले.

  • काही विहिरी दगड, वाळू व चिखलाने पूर्ण भरल्या.

  • महादेव भगवान मरकड यांच्या ड्रॅगन फ्रुट बागेचे पूर्ण नुकसान झाले.

वीजपुरवठा खंडित

अनेक वीजवाहक पोल आणि रोहित्रे निकामी झाल्याने पाथर्डी तालुक्यात वीजपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला.

प्रशासनाचा बचाव व मदत मोर्चा

प्रांताधिकारी प्रसाद मते, तहसीलदार उद्धव नाईक, पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभाग, पोलीस दल, अग्निशमन पथक व स्थानिक नागरिक बचाव कार्यात गुंतले आहेत.

  • अनेक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली.

  • नदीकाठ व तलाव परिसरातील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला.

  • काही कुटुंबांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे.

नागरिकांची आठवण : ४० वर्षांनंतर एवढा पाऊस

स्थानिक नागरिकांनी सांगितले की, चाळीस वर्षांनंतर एवढ्या प्रमाणात मुसळधार पाऊस आणि पुरपरिस्थिती पाहायला मिळाली आहे. पाथर्डी तालुका सध्या नैसर्गिक आपत्तीच्या छायेत आहे. जनावरे, पिके, घरे आणि वाहतूक व्यवस्था यांचे मोठे नुकसान झाले असून नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण आहे. प्रशासनाकडून मदत कार्य सुरू असले तरी पुढील काही दिवस सतर्कतेचा इशारा कायम आहे.