Nagarparishad Election | नगरपरिषद निवडणुकीदरम्यान गोंधळ; कोपरगाव व राहुरी फॅक्टरीत राडा!

जिल्ह्यातील कोपरगाव, देवळाली-प्रवरा, पाथर्डी या तीन नगरपरिषदांसह नेवासा नगरपंचायतीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. मात्र, कोपरगाव आणि राहुरी फॅक्टरी येथे विरोधी उमेदवारांचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने बाचाबाची आणि राड्याचे प्रकार घडले.

Dec 20, 2025 - 19:25
Nagarparishad Election | नगरपरिषद निवडणुकीदरम्यान गोंधळ; कोपरगाव व राहुरी फॅक्टरीत राडा!
Kopargaon Nagarparishad Election rada

अहिल्यानगर : जिल्ह्यातील कोपरगाव आणि राहुरी फॅक्टरी येथे नगरपरिषद निवडणुकीसाठी सुरू असलेल्या मतदान प्रक्रियेदरम्यान गोंधळ आणि तणाव निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. शनिवारी (आज) जिल्ह्यातील कोपरगाव, देवळाली-प्रवरा, पाथर्डी या तीन नगरपरिषदांसह नेवासा नगरपंचायतीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. मात्र, कोपरगाव आणि राहुरी फॅक्टरी येथे विरोधी उमेदवारांचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने बाचाबाची आणि राड्याचे प्रकार घडले.

कोपरगाव येथील एस. जी. महाविद्यालयातील मतदान केंद्रावर दुपारच्या सुमारास मोठा गोंधळ उडाला. सकाळपासून शांततेत सुरू असलेल्या मतदानाला अचानक तणावाचे वळण लागले. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद उफाळून आला. मतदान केंद्राच्या प्रवेशद्वाराजवळ दोन्ही गट आमने-सामने आल्याने परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली होती.

आरोप-प्रत्यारोपांमुळे वातावरण तापले असताना पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केला. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांना मतदान केंद्र परिसरातून दूर हटवले. या कारवाईदरम्यान काही मतदार प्रतिनिधी आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याचेही पाहायला मिळाले. मात्र, पोलिसांनी संयम राखत परिस्थिती नियंत्रणात आणली.

या घटनेनंतर काही काळ मतदानाचा वेग मंदावला होता. पोलिस प्रशासनाने परिसरात अतिरिक्त बंदोबस्त तैनात करत कडक पहारा ठेवला असून, केवळ अधिकृत ओळखपत्र असलेल्या व्यक्तींनाच मतदान केंद्रात प्रवेश दिला जात आहे. दुपारनंतर मात्र परिस्थिती सुरळीत होत मतदारांची गर्दी पुन्हा वाढताना दिसून आली.

निवडणूक अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत सुमारे 18 टक्के मतदान झाले होते. थंडीमुळे सकाळच्या सत्रात मतदानाचा वेग काहीसा कमी होता, मात्र दुपारनंतर नागरिकांचा सहभाग वाढल्याचे चित्र दिसून आले.

कोपरगाव नगरपरिषद निवडणूक ही पारंपरिकदृष्ट्या काळे आणि कोल्हे या दोन राजकीय गटांच्या वर्चस्वाची मानली जाते. या पार्श्वभूमीवर यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली आहे. मतदान केंद्रावर गर्दी वाढल्यानंतर मतदारांवर प्रभाव टाकण्याचे आरोप झाल्यानेच वादाला तोंड फुटल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, या प्रकारानंतर पोलीस प्रशासन अधिक सतर्क झाले असून शहरातील इतर मतदान केंद्रांवरही बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. गस्त वाढवण्यात आली असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दक्षता घेतली जात आहे. प्रशासनाकडून मतदारांना शांततेत मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले असून, कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.